Wednesday, January 14, 2026
Homeइचलकरंजीकागल येथे शॉर्ट सर्किटमुळे गवताच्या गंजी जळून खाक; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

कागल येथे शॉर्ट सर्किटमुळे गवताच्या गंजी जळून खाक; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

कागल तालुक्यातील करंजिवणे येथे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून जनावरांच्या चाऱ्याच्या गंजी जळून खाक झाल्या. या आगीत शेतकऱ्यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून ऐन थंडीच्या दिवसांत जनावरांच्या वैरणीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

 

करंजिवणे येथील ग्रामस्थ विद्यामंदिर शाळे शेजारी ‘गोठण’ नावाच्या जागेत शेतकऱ्यांनी जनावरांसाठी गवत आणि पेंढ्याच्या (पिंजर) गंजी रचून ठेवल्या होत्या. या परिसरातून महावितरणची ११ हजार व्होल्ट क्षमतेची विद्युत वाहिनी गेली असून तिथेच एक डी.पी. बसवण्यात आली आहे. या डी.पी.मध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या उडाल्या आणि जवळच असलेल्या गंजींनी पेट घेतला.

 

आगीचे रौद्ररूप आणि मदतकार्य

 

वाळलेले गवत असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच संताजी घोरपडे साखर कारखाना, बिद्री कारखाना, मंडलिक कारखाना आणि मुरगुड नगरपालिकेचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. तसेच अनुश्री रोड कंपनीच्या टँकरनीही पाणी पुरवठा केला. सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली.

 

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

 

या आगीमध्ये मधुकर गोजारे, पुंडलिक गोजारे, सदाशिव आग्रे, संभाजी बाबर, शालन सुतार, प्रवीण पवार आणि सात्तापा आंग्रे या शेतकऱ्यांची वैरण जळून खाक झाली. या आगीत अंदाजे १ ते १.५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन हंगामात चारा जळाल्याने या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले असून, नुकसानीचा पंचनामा करून भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -