Wednesday, January 14, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापूर: जिंकणाऱ्या जागांवरच चर्चेची अट; आघाडीचा ७४:५:२ चा फॉर्म्युला

कोल्हापूर: जिंकणाऱ्या जागांवरच चर्चेची अट; आघाडीचा ७४:५:२ चा फॉर्म्युला

गेल्या आठ दिवसांपासून मॅरेथॉन बैठका, अहवाल, चर्चेच्या फेऱ्या पार पडल्यानंतर महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यावर अंतिम मोहोर उठवण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

 

त्यानुसार काँग्रेसला ७४ जागा, उद्धवसेनेला पाच, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला दोन जागा देण्यात येणार आहेत. ‘जिंकणाऱ्या जागांवरच चर्चा’ हे सूत्र काँग्रेसने वापरल्याने उद्धवसेना व राष्ट्रवादीने एक पाऊल मागे येत या जागांसाठी सकारात्मकता दर्शवली असल्याचे समजते.

 

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून एकत्र रिंगणात उतरण्याचा निर्णय मागील दोन महिन्यांपूर्वीच काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जाहीर केला होता. या निवडणुकीत उद्धवसेना व राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा हव्यात हे जाणून घेण्यासाठी काँग्रेसने समिती नेमली होती. या समितीने या दोन्ही पक्षांशी केलेल्या चर्चेनुसार उद्धवसेनेने ३३, तर राष्ट्रवादीने ३५ जागांची मागणी केल्याने महाविकास आघाडीची गाडी चर्चेच्या फेऱ्यात अडकली होती.

 

राजारामपुरीसह शिवाजी पेठेतील काही जागांवर उद्धवसेनेने दावा केल्याने हा फॉर्म्युला ठरता ठरत नव्हता. शिवाय काँग्रेसच्या काही हक्काच्या जागांवरही या दोन्ही पक्षांनी हक्क सांगितल्याने त्यावर घोडे अडले होते. मात्र, शुक्रवारी काँग्रेसने या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत ‘जिंकणाऱ्या जागांवरच चर्चा’ ही अट ठेवत संवाद साधल्याने तिन्ही पक्षांमध्ये एकमताचा सूर तयार झाला. त्यामुळे ७४:०५ : ०२ हे जागावाटपाचे सूत्र आकाराला आल्याचे समजते.

 

इतर पक्षांना एक जागा जाण्याची शक्यता

 

महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी, शेकाप, माकप, भाकपसह ”आप”चाही समावेश आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागांमधून एक जागा ‘आप’ ला दिली जाण्याची शक्यता आहे.

 

फुटलेले पक्ष, क्षमता, ताकदीचाही झाला विचार

 

गत महापालिका निवडणुकीत काँग्रेसने एकसंघ राष्ट्रवादी व एकसंघ शिवसेनेला सोबत घेत सत्ता काबीज केली होती. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने सेना व राष्ट्रवादीची शकले झाली आहेत. विभागलेल्या पक्षांची ताकद, क्षमता व इच्छुकांची संख्या हेही मुद्दे हा फॉर्म्युला ठरवताना विचारात घेतले गेले आहेत.

 

एका एका उमेदवारांवर झाली चर्चा

 

महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसकडून सर्वाधिक ३५० इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मागितली आहे. सर्वच प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने कुणाला उमेदवारी द्यायची असा पेच नेतृत्वासमोर आहे. त्यामुळे जागा वाटपांमध्ये पक्षाची ताकद, इच्छुकांची संख्या व जनाधर या त्रिसुत्रीवर काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. ‘किती जागा लढवणार’ यापेक्षा ‘किती जागा जिंकणार’ हे सूत्र काँग्रेसने घटक पक्षांसमोर ठेवले होते. प्रत्येक प्रभागातील एका एका उमेदवारांवर चर्चा केल्यानंतर जिंकणाऱ्या जागांचा अंदाज तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आला. त्यानंतरच हा फॉर्म्युला आकाराला आल्याचे कळते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -