राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपदाची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीची कमान सुनेत्रा पवार यांनी हाती घ्यावी आणि उपमुख्यमंत्रीपदही त्यांनी सांभाळावं यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या घडामोडींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
अजितदादा समर्थकांचीही मागणी
दरम्यान, अजित पवार यांच्या नंतर सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करावं, अशी मागणी अजितदादा समर्थकांनी केली आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर बारामतीतील अजितदादा प्रेमींनी ही भावना व्यक्त केली आहे. सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री केले तर उपमुख्यमंत्रीपदावर सुनेत्रा अजित पवार हे नाव कायम राहिल, असं सांगतानाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आता सर्व पवार कुटुंबाने एकत्रित येऊन निर्णय घ्यावा, अशी भावनाही कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. अजितदादांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही. मात्र आता कुटुंबाने चर्चा करुन नेतृत्व ठरवावे, असं मत हे कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत.
अजित पवार यांचे अपघाती निधन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. विमान आकाशात असताना स्फोट झाला. त्यानंतर विमान थोडे झुकले आणि विमानतळाच्या आधीच एका शेतात कोसळले. त्यानंतर विमानाचे आणखी दोन-तीन स्फोट झाले. विमानात अजितदादांसह असलेल्या चार जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. आज 29 जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर शासकीय सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक प्रमुख नेते त्यावेळी उपस्थित होते.






