Tuesday, February 10, 2026
Homeमहाराष्ट्रपरिक्षेला उशीरा आल्याचा जाब विचारताच विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या कानशिलात लावली; म्हणाला, 'तू मला...

परिक्षेला उशीरा आल्याचा जाब विचारताच विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या कानशिलात लावली; म्हणाला, ‘तू मला विचारणारी कोण?’

भारतात शिक्षकांबाबत ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु’ असा आदराने उल्लेख केला जातो. मात्र जसा काळ पुढे चालला आहे, तसा विद्यार्थी आणि शिक्षकांमधील पूर्वीचा आदरपूर्वक संवाद हरपत चालला आहे.

विशेषतः जेन झी शिक्षकांना फार सन्मान देत नसल्याचे वारंवार समोर आलेले आहे. गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पूर्व परिक्षेला उशीरा येणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याला महिले शिक्षिकेने जाब विचारताच संतापलेल्या विद्यार्थ्याने या शिक्षिकेच्या कानशिलात लगावली. सदर प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला असून आता शिक्षक विद्यार्थ्यांपासून सुरक्षित नसल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

 

नेमके प्रकरण काय आहे?

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जानेवारी रोजी सदर प्रकार शेहरा येथे एसजे डेव्ह हायस्कूलमध्ये घडला. १८ वर्षांचा मोहम्मद खान अन्सारी नावाचा विद्यार्थी पूर्व परिक्षेसाठी उशिरा पोहोचला. वर्गात उपस्थित असलेल्या महिला पर्यवेक्षकांनी त्याला उशिरा येण्याचे कारण विचारले असता मोहम्मद खान उर्मटपणे बोलू लागला. तो म्हणाले, मला घरी कधी कुणी विचारत नाही. तुम्ही मला प्रश्न विचारणारे कोण? त्यानंतर त्याने शिक्षिकेच्या कानशिलात लगावली. तसेच शिक्षिकेला धक्का देऊन तो तिथून पळून गेला.

 

पोलिसांनी सांगितले की, सदर घटना शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. नंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला. आता अनेकजण या घटनेवर संताप व्यक्त करत आहेत. सदर विद्यार्थ्याच्या पालकांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी शिक्षक आणि मुख्याध्यापकांची माफी मागितली.

 

मात्र २७ जानेवारी रोजी या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले. सदर विद्यार्थी आपल्या वडिलांसह १५ ते २० जणांना घेऊन शाळेत आला. त्याने शिक्षिकेला धमकी दिली की, ती या शहरात एकटीच राहते, त्यामुळे तिने स्वतःची काळजी घेतली पाहिजे, असे सांगून विद्यार्थी आणि त्याच्या वडिलांनी शिक्षिकेला धमकावले.

 

शिक्षिकेच्या तक्रारीनंतर ३ फेब्रुवारी रोजी विद्यार्थी, इतर चार लोक आणि जमावाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या गुन्ह्यात आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक अंकुर चौधरी यांनी सांगितले की, त्यांनी शिक्षिकेला पुन्हा त्याच वर्गात नेऊन गुन्ह्याच्या दिवशीचा घटनाक्रम समजून घेतला. आरोपीची ओळख उघड होऊ नये म्हणून त्यांनी सदर विद्यार्थ्याला घटनास्थळी नेणे टाळले.

 

यानंतर आरोपी विद्यार्थ्याला न्यायालयात हजर करण्यात आले. शुक्रवारी (६ फेब्रुवारी) त्याला जामीन मंजूर करण्यात आला. विद्यार्थ्याने दावा केला की, तो जमावासह शाळेत शिक्षिका आणि कर्मचाऱ्यांची माफी मागण्यासाठी परतला होता.

 

या घटनेमुळे पंचमहल जिल्ह्यातील शिक्षिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. या घटनेत जे लोक दोषी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. पोलिसांनी मात्र तपास सुरू असल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -