चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठी जबरदस्त संघबांधणी केली आहे. CSK ने आयपीएल लिलावात युवा खेळाडूंसाठी मोठी रक्कम मोजली आणि पुन्हा एकदा आयपीएलमध्ये भरारी घेण्यासाठी हा संघ सज्ज आहे.
पण, त्यांनी ज्या युवा खेळाडूसाठी १४.२० कोटी मोजले आहेत, तो क्रिकेट सामना खेळताना अचानक मैदानावर कोसळला आहे. त्यामुळे CSK चे टेंशन वाढले आहे आणि त्याच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
चेन्नईने IPL 2026 Auction मध्ये कार्तिक शर्मासाठी ( Kartik Sharma ) तब्बल १४ कोटी २० लाख रुपये मोजत त्याला आपल्या ताफ्यात सहभागी करून घेतलं. कार्तिकसाठी CSK, KKR आणि SRH यांच्यात चुरस पाहायला मिळाली होती, मात्र सीएसकेने बाजी मारली. पण, आज एक स्थानिक सामना खेळताना कार्तिक शर्मा अचानक जमिनीवर कोसळला. त्याने विपराज निगमच्या पहिल्या तीन चेंडूंवर सलग चौकार खेचले, परंतु चौथ्या चेंडूचा सामना करण्यापूर्वी तो थांबला अन् अचानक जमिनीवर आडवा झाला.
वैद्यकिय टीम तातडीने त्याच्याजवळ धावत आली, खेळाडूंनीही घोळका केला. कार्तिकच्या पाठीत असह्य वेदना होत असल्याचे त्याच्या चेहऱ्यावरून जाणवत होते. त्याची ही दुखापत नेमकी किती गंभीर आहे, हे अद्याप समजलेले नाही. पण, तो न खेळल्यास चेन्नईला मोठा धक्का बसू शकतो.
Who is Karthik Sharma?
१९ वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाज कार्तिक शर्मा मुळचा राजस्थानचा आहे. तो लांब षटकार मारण्यासाठी आणि फिनिशर म्हणून मारण्यासाठी ओळखला जातो. कार्तिकने आतापर्यंत १२ ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये १६४ च्या स्ट्राईक रेटने ३३४ धावा केल्या आहेत. यात २८ षटकारांचा समावेश आहे. केविन पीटरसन आणि रविचंद्रन अश्विन यांसारख्या दिग्गज खेळाडूंनीही कार्तिकचं कौतुक केलं आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये कार्तिकने ५ सामन्यांत १६० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने १३५ धावा केल्या आहेत. कार्तिकने आतापर्यंत ८ प्रथम श्रेणी सामने, ९ लिस्ट ‘अ’ सामने आणि १२ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे ४७९, ४४५ आणि ३३४ धावा केल्या आहेत. यात त्याने एकूण ७८ षटकार लगावले आहेत.





