Saturday, February 21, 2026
Homeमहाराष्ट्रकुणी फोडली १२वीची केमिस्ट्रीची प्रश्नपत्रिका? नागपूर पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा, खासगी शिकवणीशी...

कुणी फोडली १२वीची केमिस्ट्रीची प्रश्नपत्रिका? नागपूर पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा, खासगी शिकवणीशी संबंध उघड

राज्य शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात बुधवारी (ता.१८) बारावीचा रसायनशास्त्र विषयाची प्रश्‍नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच एका विद्यार्थिनिच्या व्हॉट्सॲपवर व्हायरल झाली. केंद्रप्रमुख्याच्या सतर्कतेमुळे गैरप्रकार होण्यापूर्वी एका मुलीला ताब्यात घेण्यात आले.

 

मात्र, एका खासगी शिकवणी वर्गाद्वारे हा पेपर फोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून सदर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

राज्य शिक्षण मंडळाद्वारे बारावीच्या परीक्षेसाठी सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल हे केंद्र देण्यात आले आहे. या केंद्रावर बुधवारी बारावीचा रसायनशास्त्र (केमिस्ट्री) या विषयाचा पेपर होता. त्यापूर्वी केंद्रावरील वर्गात बसलेली विद्यार्थिनी ही प्रसाधनगृहात जातो असे सांगून निघाली. ती बराच परत न आल्याने वर्गातील पर्यवेक्षक असलेल्या शिक्षिकेला शंका आली. काही वेळाने ती परत आली. यानंतर पेपरदरम्यान ती सातत्याने प्रसाधनगृहात जात असल्याने शिक्षिकेला तिच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्या.

 

शिक्षिकेने तिची तपासणी घेतली. त्यात तिच्याकडे स्मार्टफोन असल्याचे आढळून आले. शिक्षिकेने तिला स्मार्टफोन पासवर्ड टाकून सुरू करण्यास सांगितला. तिने तो सुरू करताच, त्यात व्हॉट्सॲप ग्रुपवर रसायनशास्त्राची प्रश्‍नपत्रिका आढळून आली. मोबाइलच्या तपासणीमध्ये पेपर सुरू होण्याआधीच प्रश्‍नपत्रिका तिच्याकडे आल्याचेही शिक्षिकेच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याच ग्रुपवर संभाव्य उत्तरांचाही आदानप्रदान झाल्याचे समोर आले.

 

शिक्षिकेने तत्काळ केंद्रप्रमुखांना माहिती दिली. केंद्रप्रमुखांनी बोर्डाला माहिती दिल्यावर तत्काळ पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी विद्यार्थिनीची चौकशी करण्यात आली. तिच्या जबाबावरून आणखी एका विद्यार्थिनीची चौकशी करण्यात आली. प्राथमिक तपासात एका खाजगी शिकवणीशी संबंधित व्यक्तीने पैशांच्या मोबदल्यात प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंदवून मोबाईल व ग्रुपमधील संदेशांचा तांत्रिक तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परीक्षा प्रक्रियेतील सुरक्षाव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, जबाबदारांवर कडक कारवाईची मागणी होत आहे.

 

अनेक विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर?

 

विद्यार्थिनीच्या मोबाइलवर एका ग्रुपमध्ये ही प्रश्‍नपत्रिका असल्याने ती शहरातील इतर विद्यार्थ्यांकडही गेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रश्नपत्रिका केवळ एका केंद्रापुरती मर्यादित नसून राज्यातील इतर भागांपर्यंतही पोहोचल्याची शक्यता तपासली जात आहे. प्रश्नपत्रिका नेमकी कुठून बाहेर पडली, त्यासाठी कोणते तांत्रिक माध्यम वापरण्यात आले आणि या जाळ्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -