बदलापूर शहर पुन्हा एकदा धक्कादायक घटनेने हादरले आहे. शाळेच्या स्कूलबसमध्येच एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा बस चालकाकडून विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
विशेष म्हणजे, या बसमध्ये विद्यार्थिनींसोबत कोणतीही महिला मदतनीस उपस्थित नव्हती.
मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर!
या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बदलापूरमधील एका नामांकित खासगी शाळेची ही बस विद्यार्थ्यांची ने-आण करत होती. शाळा सुटल्यानंतर संबंधित विद्यार्थिनीला घरी सोडताना बस चालकाने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.
बस चालकाविरुद्ध ॲट्रॉसिटी गुन्हा
घडलेला प्रकार विद्यार्थिनीने घरी सांगितल्यानंतर संतप्त पालकांनी तात्काळ बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी बस चालकाविरुद्ध पोक्सो कायदा, तसेच ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
बदलापुरात काय चाललंय?
दरम्यान, काही दिवसांपूर्वीही बदलापूरमध्ये अशाच प्रकारची घटना समोर आली होती. एका स्कूल व्हॅन चालकाने चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला होता. त्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पुन्हा घडलेल्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
चाकणकरांनी नुकताच केलेला बदलापूरचा दौरा
योगायोगाने, नुकताच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी बदलापूरचा दौरा करून शाळांच्या सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला होता. तरीही अशा घटना घडत असल्याने सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.







