अन्न आणि औषध विभागातील लाचखोरीचे प्रकरण सध्या गाजत असतानाच या विभागातील इतर अनेक गैरव्यवहारही आता उघड होत आहेत. सामान्य जनतेच्या जीवनाशी थेट निगडित असलेल्या अन्न आणि औषध प्रशासनात ढिसाळ कारवाई कुणामुळे होतेय हा सुद्धा तपासणीचा विषय असून एका निवेदनाद्वारे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी लक्ष घालण्याची आणि सत्वर कारवाईची विनंती करण्यात आली आहे.
उल्हास इंगोले या अधिकाऱ्याविरोधात तक्रार
अन्न व औषध विभागातील गैरकारभाराची चर्चा ठळकपणे समोर येण्याला या विभागातील अधिकाऱ्यांनी चालवलेले भ्रष्ट वर्तुळ कारण ठरले आहे. या वर्तुळाच्या केंद्रस्थानी उल्हास इंगोले नामक अधिकाऱ्याच्या उचापती असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आलेली आहे. श्वेता महाले आणि अमोल मिटकरी या दोन आमदारांनी इंगवलेच्या विरोधात कारवाईची केलेली मागणी आणि सभागृहात विभागीय चौकशीचे दिलेले आश्वासन हवेतच विरले असल्याने विभाग ना काम करू शकतोय ना भेसळ रोखू शकतोय अशी भावना व्यक्त होत असून एकाच पदावर वर्षानुवर्षे चिकटून राहणाऱ्या या अधिकाऱ्यावर इतकी मेहेरनजर का? असा थेट सवाल आता उपस्थित झाला आहे.
निवेदनातील महत्त्वाच्या बाबी
मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये इतरही काही बाबी ठळकपणे मांडण्यात आल्या आहेत त्या अशा, दक्षता सह आयुक्तांकडून उल्हास इंगोले याची चौकशी झाली. तरीही, अद्याप अहवाल का सादर झालेला नाही? ते तपासावे. अन्न आणि औषध विभागाचा अधिकारी उल्हास इंगोले हाच प्रतिबंधित गुटख्याच्या विक्रीत असल्याचा आक्षेप जबाबदारीने विधान परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. तरीही संबंधित व्यक्ती पदावर का ? उल्हास इंगोले याच्या संपत्तीची आणि भ्रष्ट्र कारभाराची चौकशी करण्याची भाजपा आमदार श्वेता महाले यांची मागणी अद्यापही दुर्लक्षित का? उल्हास इंगोले याने मुख्यालय सह आयुक्त (अन्न) हा अतिरिक्त कार्यभार बेकायदेशीरपणे अनेक वर्षे स्वतःच स्वतःकडे घेतला आहे. त्याची चौकशी व्हावी. गेली अनेक वर्षे बदली न होता उल्हास इंगोले एकाच पदावर इतकी वर्षे कसा याची खातेनिहाय चौकशी करून त्यांना पदमुक्त करावे.
महाराष्ट्र पोलिसांना नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत देण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश याने कुठल्या अधिकारात काढला ते तपासावे, असे सवाल उपस्थित करत सदर प्रकरणात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे आणि उल्हास इंगोले याच्या कचाट्यातून विभागाला सोडवा अशी मागणीही निवेदनात करण्यात आलेली आहे.
भ्रष्ट अधिकाऱ्याच्या तावडीतून सुटल्यास विभाग प्रभावी काम करू शकेल असे मत तक्रारदार सूरज केराप्पा पडवळकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालून उल्हास इंगोले याच्या अन्न आणि औषध विभागाच्या एकूणच व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे तक्रारदार सूरज केराप्पा पडवळकर यांनी केलेली आहे.






