जगात असा एकही माणूस नाही की, ज्याला संकटाचा सामना करावा लागत नाही. संकट आले नाही, असे होत नाही. संकटाची तीव्रता, संकटाची वारंवारता आणि संकटाचे परिणाम यामुळे माणूस खचून जात असतो.
आताही जगभरात अशा अनेक गोष्टी घडत आहेत, ज्यामुळे संपूर्ण जग स्तब्ध होत आहे. जीवन आणि जगणे याची किंमत कळते. अशी अनेक माणसे असतात की, जी कितीही संकटे आली तरी त्यावर मात करतात. संकट कितीही मोठे असले, तरी शांतपणे त्याला सामोरे जातात. हे प्रत्येकाला जमते असे नाही. अनेक माणसे संकटात निराश होतात, खचतात. काही संकटे अचानक समोर येत असतात, ध्यानी मनी नसताना अशा घटना घडतात की, त्यात माणूस अडकला जातो. संकट यायच्या आधी स्वामी काही ना काही संकेत देत असतात, ते संकेत ओळखणे हे अनेकदा फायदेशीर ठरू शकते.
स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. ते अव्यक्त आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामींची कृपा उदंड व त्याच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अविनाशी त्रिकालबाधित सत्य आहे. स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे होईल. स्वामी कालांतक आहेत. ते कृपासागर आहेत. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हा अचल, अढळ आणि अखंड आत्मविश्वास देणारे स्वामी महाराज आहेत. भाविकांच्या हाकेला धावून जात अशक्यही शक्य करणारे स्वामी आहेत. त्यामुळे संकट येणार असते, तेव्हा स्वामी प्रेरणा, संकेत देत असतात, असे म्हटले जाते.
स्वामी कृपेने ती प्रेरणा आपल्याला मिळत असते
संकट येतात, तेव्हा स्वामी काही ना काही संकेत देत असतात. प्रेरणा देत असतात. कोणतेही संकट येते, तेव्हा आतला आवाज आपल्याला संकेत देत असतो. अमूक एक गोष्ट आत्ता केली पाहिजे किंवा एखादी गोष्ट आत्ता करता कामा नये. त्या क्षणी तो ऐकला पाहिजे. या क्षणी बाहेर पडता कामा नये, असे आपले मन आपल्याला सांगत असते. स्वामी कृपेने ती प्रेरणा आपल्याला मिळत असते. परंतु, ती गोष्ट आपण समजली पाहिजे. तेव्हा पाच मिनिटे तरी थांबायला हवे, असे म्हटले जाते.
दोन मिनिटे थांबा, पाणी प्या, स्वामींचे स्मरण करा
अनेकदा असेही होते की, आपण काहीतरी विसरत असतो. एकापेक्षा अधिक वेळेस मागे फिरतो. घराबाहेर पडल्यावर नेमके काहीतरी आठवते आणि आपण परत माघारी येतो. असे एकापेक्षा जास्त वेळा झाले असेल, तर समजावे की, ज्या कामासाठी आपण निघालो आहोत, ते काम होण्यात अडचणी येणार आहेत. असे संकेत अप्रत्यक्षरित्या स्वामींकडून मिळत असतात. अशावेळेस आपण किमान १० मिनिटे घरी थांबून मग बाहेर पडावे. १० मिनिटे घरी थांबणे शक्य नसेल, तर किमान दोन मिनिटे थांबावे, पाणी प्यावी, स्वामींचे स्मरण करावे आणि बाहेर पडावे, असे सांगितले जाते.
स्वामींचे तुमच्याकडे लक्ष असते. तुमच्या इष्टदेवतेचे लक्ष असते. ते तुम्हाला हे अशा प्रकारचे संकेत देत असतात. अनेकदा एखादी व्यक्ती केवळ दोन मिनिटे उशिर झाल्यामुळे भयंकर मोठ्या अपघातातून बचावल्याचे आपण ऐकतो. अशा वेळेस त्या व्यक्तीचे भाग्य थोर म्हणून ती बचावली, त्यामागे काहीतरी घडते, प्रेरणा मिळते, संकेत असतात, असेही म्हटले जाते.





