हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या वादातून युवकावर सपासप चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. जावीद रशीद मुजावर (वय 19, रा.जावईवाडी, तारदाळ) असे हत्या झालेल्याचे नाव आहे.
या घटनेत हल्लेखोर यश तानाजी गायकवाड (21) हाही जखमी झाला. उपचाराअंती त्याला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास नागनाथ मंदिरासमोर घडली. घटनेनंतर परिसरातील व्यावसायिकांनी आपली दुकाने पटापट बंद केली. भरचौकात घडलेल्या या घटनेमुळे तारदाळ परिसरात भीतीचे वातावरण आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी गावात मोठा बंदोबस्त ठेवला आहे. फिर्याद मृताचे वडील रशीद ताजुद्दीन मुजावर (45) यांनी शहापूर पालिस ठाण्यात दिली.
जावीद आणि यश यांच्यात तारदाळ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवेळी किरकोळ वाद होऊन भांडण झाले होते. तेव्हापासून संशयित यश हा जावीदवर चिडून होता. रविवारीही त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास दोघांमधील वाद पुन्हा उफाळून आला. वादाचे पर्ववसान हल्ल्यात झाले. जावीदने चाकूने यशवर हल्ला केला. हल्ला रोखताना यशने तोच चाकू हिसकावून घेवून जावीदवर उलट वार केला. या घटनेत जावीद गंभीर जखमी झाला. यावेळी जीव वाचवण्यासाठी तो गणेश मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत असणार्या वाहनाच्या मागे गेला असता यशने त्याचा पाठलाग करीत पुन्हा वार केले.
जावीदच्या गळ्यावर, पाठीवर, डोकीमध्ये, हातावर वर्मी घाव बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. उपचारासाठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे तारदाळ चौक व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरा या घटनेची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे.





