पालापाचोळा जाळण्यासाठी शेताकडे गेलेल्या शेतकऱ्याच्या पायाला ठेच लागून आगीच्या लोळात सापडल्याने गंभीर भाजून त्यांचा मृत्यू झाला. शंकर बापू चव्हाण (वय ७०, रा.चव्हाणवाडी, ता. आजरा) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास ‘वडाचे नाव’ या शेतात घडली.
मॉन्सून दाखल होण्यापूर्वी धुळवाफ पेरणी करण्याची परंपरा या परिसरात आहे. त्यामुळे पेरणीपूर्वी मशागतीची कामे सध्या जोरात सुरू आहेत. बांधबंदिस्ती करणे तसेच शेतात जमा झालेला पालापाचोळा जाळून शेत स्वच्छ करणे ही कामे सुरू आहेत. उन्हाची तमा न बाळगता शेतकरी ही कामे कष्टाने करीत आहेत.
शेतात जमा झालेला पालापाचोळा जाळण्यासाठी शंकर चव्हाण हे सकाळी शेताकडे गेले होते. जमा झालेला पालापाचोळा एकत्र करून त्यांनी तो पेटवला. उन्हाच्या तडाख्यामुळे ही आग शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधाला लागली. ही आग जोराने पसरू लागल्याने शेजारच्या शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये, म्हणून ते हातात झाडांची फांदी घेऊन धावत सुटले.
यावेळी त्यांच्या पायाला ठेच लागून पायाचा अंगठा रक्तबंबाळ झाला. या धावपळीत ते आगीत पालथे पडले. आग मोठी असल्याने ते चेहऱ्यापासून पायापर्यंत भाजले. जवळपास कोणीही शेतकरी नसल्याने त्यांना कोणतीच मदत मिळाली नाही. काही वेळाने त्यांचे नातेवाईक त्या ठिकाणाहून जात असताना त्यांनी हा प्रकार पाहिला. जवळ जाऊन पाहिले असता ते मृत झाल्याचे आढळले. चव्हाण यांच्या मागे पत्नी व दोन विवाहित मुली असा परिवार आहे.


