Friday, May 1, 2026
Homeमहाराष्ट्रमुलीच्या लग्नासाठी आयुष्यभर बाप झिजला अन् पाठवणीनंतर जगातून कायमचा निघून गेला... पन्हाळा...

मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभर बाप झिजला अन् पाठवणीनंतर जगातून कायमचा निघून गेला… पन्हाळा तालुक्यात हळहळ

एका बाजूला दिवसभर मुलीच्या लग्नाची मंगलमय धामधूम आणि दुसऱ्या बाजूला रात्री पितृछत्र हरवल्याची हृदयद्रावक घटना पन्हाळा तालुक्यातील माजगाव (माळवाडी) येथे घडली.

 

मुलीला सासरी पाठवल्यानंतर (पाठवणी) अवघ्या काही वेळातच सखाराम शिवाजी विचारे (वय ६४) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या घटनेमुळे विवाह सोहळ्याचे रूपांतर शोकाकुल वातावरणात झाले असून, संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

 

मंगळवारी सखाराम विचारे यांची मुलगी डॉ. सुविधा हिचा विवाह माजगाव येथील इंजिनिअर निखिल पाटील यांच्यासोबत मोठ्या उत्साहात पार पडला. सखाराम विचारे लाडक्या लेकीच्या लग्नासाठी अत्यंत आनंदी होते. लग्नाच्या प्रत्येक विधीमध्ये ते उत्साहाने सहभागी झाले होते. इतकेच नव्हे, तर लग्नातील आनंदोत्सव साजरा करताना त्यांनी नृत्याचाही मनमुराद आनंद लुटला.

 

आपल्या मुलीचे कन्यादान करताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि अभिमान दिसत होता. सायंकाळी अत्यंत भावूक वातावरणात त्यांनी मुलीची पाठवणी केली. आपल्या आयुष्यातील एक मोठी जबाबदारी पूर्ण झाल्याचे आणि मुलीला सुखी संसार लाभो, हे पाहण्याचे समाधान त्यांच्या डोळ्यांत होते.

 

मुलीला निरोप दिल्यानंतर रात्री ८ च्या सुमारास त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले . मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

 

ज्या घरात काही तासांपूर्वी सनईचे सूर आणि आनंदाचे वातावरण होते, तिथे आता दुःखाचे काळे ढग दाटले आहेत. या अचानक ओढवलेल्या संकटामुळे नातेवाईक सुन्न झाले आहेत. त्यांच्या अशा अचानक जाण्याने विचारे कुटुंबावर, तसेच सासरी गेलेल्या मुलीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -