इचलकरंजी-सांगली मार्गावरील यड्राव फाटा चौक म्हणजे रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता असा झाला आहे. संपूर्ण चौक खड्डेमय झाल्याने याठिकाणी अपघात आणि वाहतूकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. वारंवार मागणी करुनही दुर्लक्ष होत असल्याने युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने या चौकातील खड्ड्यात केक कापून वाढदिवस साजरा करत अनोख्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले.
शहर परिसरात विविध कारणांनी केलेल्या खोदकामामुळे रस्ते खड्डेमय झाले आहेत. इचलकरंजी-सांगली मार्गावरील यड्राव फाटा हा मुख्य चौकसुध्दा वर्षभरापासून खड्डेमय झाला आहे. या चौकात वारंवार अपघात आणि वाहतूक कोंडीचे प्रकार घडत असल्याने रस्ते दुरुस्तीची मागणी सातत्याने केली जात आहे. पण त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने युवा महाराष्ट्र सेनेच्यावतीने या चौकातच उपरोधात्मक आंदोलन करण्यात आले. सॅम आठवले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी या खड्यात प्रतिकात्मक जखमीच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी रस्त्याची दुरुस्ती करुन खड्डे न मुजविल्यास लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी यांना निमंत्रित करुन त्यांच्या हस्ते या खड्ड्यांचा तेरावा घालण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या आंदोलनात बसवराज टक्कळगी, भरत जोशी, राजू दड्डी, तुषार शिंदे, आनंदा नाईक, सदाशिव बड्डीगरी सहभागी झाले होते.





