कोल्हापूरमध्ये भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातील उत्तुर-बहिरेवाडी मार्गावर घडली आहे. दुचाकी आणि टेम्पोची धडक झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला.
दीपक चांदे (वय 39), शोभा चांदे (वय 35), जय चांदे (वय 10), पूर्वा चांदे (वय 7), अशी अपघातातील मृतांची नावं आहेत. मृत पावलेल्यामध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे.
व्होन्याळी गावचे चांदे कुटुंबिय दुंडगे गावाला जात होते. हे सर्वजण मुंबई वास्तव्यास होते, पण उन्हाळी सुट्टीसाठी गावाकडे आले होते. गावाकडे नवीन घर बांधल्यानंतर पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी संपूर्ण कुटुंब मुंबईहून गावाकडे आले होते.
चांदे कुटुंबिय उद्या मुंबईला परत जाणार होते, मात्र त्याआधी पाहुण्यांना भेटण्यासाठी दुंडगे गावाला निघाले होते. मध्येच मध्येच टेम्पोची धडक बसल्याने चौघेही जागीच मृत पावले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.





