आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिचा दीर्घकाळ शारीरिक व मानसिक छळ केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. अत्याचाराचे चित्रीकरण (Video Blackmail and Repeated Harassment Details) करून त्याच व्हिडिओच्या आधारे पीडितेला वारंवार धमकावणे, विनयभंग करणे, पाठलाग करून छेडछाड करणे, अशा गंभीर प्रकारांमुळे खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अमन आदम शेख (वय २०), अल्ताफ बशीर नायकवडे (२१) आणि अनिकेत संजय भोरे (२३) यांना अटक केली आहे. उर्वरित चार संशयित अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार मार्च महिन्यात मोबाईलवर काही दाखवायचे आहे, असे सांगून तिला एका संशयिताच्या घरी बोलावले. तेथे उपस्थित असलेल्या संशयितांनी तिच्याकडे आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याची भीती दाखविली. त्यानंतर एका संशयिताने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, तर दुसऱ्याने त्याचे मोबाईलवर चित्रीकरण केले. मात्र, पीडितेने प्रतिकार करत तेथून सुटका करून घेतली.
सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेच्या कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत सातही संशयितांना ताब्यात घेतले. अटक केलेल्या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवार (ता. ६) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी दिली.
धमकी, पाठलाग अन् कुटुंब भयभीत
अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला पुन्हा एका बोळात बोलावले. तेथे आणखी काही संशयितांनी तिचा विनयभंग केला. पीडिता तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना तिचा पाठलाग करून पुन्हा विनयभंग केला. या घटनेनंतर संशयितांकडून पीडितेला सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता. तिचा पाठलाग करणे, छेडछाड करणे तसेच अत्याचाराच्या व्हिडिओचा उल्लेख करून टोमणे मारत धमकावणे, असे प्रकार सुरूच होते. त्यामुळे पीडिता आणि तिचे कुटुंब प्रचंड भयभीत झाले होते.

