आषाढी वारीच्या निमित्ताने राज्यभरातील लाखो वारकरी पंढरपुरात जमा होतात. विठुरायाचे दर्शन घेऊन हे वारकरी परत आपापल्या घरी जातात. टाळ, मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाचा जयघोष केला जातो. आषाढीला पंढरपुरात तर मोठी गर्दी होते. दरम्यान, वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासन सज्ज आहे. पोलिसांचाही चोख बंदोबस्त आहे. असे असतानाच आता प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी वारीच्या दरम्यान एकूण पंधरा दिवस पंढरपूर शहर तसेच परिसरात मांसविक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता खवय्यांना त्रास सहन करावा लागू शकतो. परंतु वारकरी या निर्णयाचे स्वागत करत आहेत.
सरकारने नेमका काय निर्णय घेतला?
आषाढी वारी असल्याने सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निर्देशानंतर त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत पंढरपूर शहर तसेच आजूबाजूच्या परिसरात मांस, मटण विक्री करण्यावर बंदी असेल. ही बंदी 15 जुलैपासून सुरू होणार असून ती 29 जुलैपर्यंत कायम असेल. एकूण 15 दिवसर मांस तसेच मटण विक्री करण्यावर पूर्णपणे बंदी असणार आहे.
नंतर मांसविक्री पुन्हा सुरू होणार
आषाढी वारीनिमित्त पंढरपूर शहरात संपूर्ण राज्यातून वारकरी येतात. परंतु काही परिसरात मांसविक्री चालू असते. यावर काही लोकांनी आक्षेप घेतला होता. वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणूनच हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. 29 जुलैनंतर पंढरपूर तसेच या शहराच्या आजूबाजूच्या परिसरात मांसविक्री पुन्हा सुरू होणार आहे. या निर्णयाचे सर्वांनी पालन करावे. प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

