धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेला संततधार पाऊस आणि धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवल्याने येथील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यावर्षी दुसऱ्यांदा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून २४ तासात येथील पंचगंगा नदीच्या पातळीत ३ फुटाने वाढ झाली आहे. गुरुवारी सायंकाळी पाणी पातळी ५६ फुटांवर पोहचली होती. महानगरपालिकेने जुना पुल वाहतुकीसाठी बंद केला असून नदी काठावर आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
गेल्या ४ दिवसांपासून सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली असून धरण पाणलोट क्षेत्रातही संततधार पाऊस सुरु असल्याने धरणातील पाण्याचा विसर्गही वाढवण्यात आला आहे. त्यामुळे येथील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदी काठावरील समाधी स्थळ, शिवमंदिर परिसर पाण्याने वेढला आहे. जुन्या पुलाला लागुन पाणी वाहत असल्याने जुना पुल बरकेट लावुन वाहतुकीसाठी बंद करण्यात आला
आहे. त्यामुळे कागल, हुपरी मार्गावरील वाहतुक मोठ्या पुलावरुन सुरु आहे.
महानगरपालिका प्रशासनाने नदी काठावर आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. इचलकरंजीत पंचगंगेची इशारा पातळी ६८ फूट असून धोका पातळी ७१ फूट आहे. राधानगरी धरणातून प्रति सेकंद चौदाशे क्युसेक पाणी पंचगंगा नदीत सोडले जात असल्याने पाणी पातळीत बाढ होणार असल्याचे आपत्कालीन यंत्रणेकडून सांगण्यात आले.



