अमळनेर येथून दोन दिवसांपूर्वीच गावी आलेल्या प्रेम गोपाल धनगर (२१) या तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला. ही घटना बुधवारी बोरनार येथे लग्नसमारंभात घडली.
याप्रकरणी पोलिसांनी १५ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
तालुक्यातील बोरनार येथे प्रेम धनगर हा आई-वडिलांसह राहत होता. काही महिन्यांपासून तो कामानिमित्त अमळनेर येथे गेला होता. दोन दिवसांपूर्वीच तो गावी आला होता. बुधवारी गावात लग्नसमारंभ असल्याने प्रेम सायंकाळी त्याठिकाणी गेला होता. तेथील काही जणांनी त्याच्यासोबत वाद घातला. या वादानंतर पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने प्रेमला मारहाण केली. एकाने धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, गिरीश पाटील, रामकृष्ण पाटील व सहकारी पोहोचले. प्रेमला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
