राधानगरी आगाराने पहिल्यांदाच राधानगरी ते पंढरपूर बस सेवा सुरू केली. सरवडे, सोळांकूरसह मार्गावरील अनेक गावांत वारकऱ्यांनी उत्साहाने या बसचे पूजन केले आणि गाडीचे प्रस्थान झाले.पण, बस कोल्हापुरात गेली आणि ‘ती’ पंढरपूरला न जाता विद्येच्या पंढरीला म्हणजे पुणे येथे पोहोचली. या बसमधील पंढरपूरला जाणारे काही प्रवासी कोल्हापूर सीबीएसवरून पंढरपूर बसमध्ये बसवले आणि राधानगरीवरून आलेली बस ऐनवेळी पुण्याला सोडली.
एसटीच्या या अजब प्रकारामुळे प्रवाशांची मात्र गैरसोय झाली. त्याचे असे झाले, राधानगरी येथून मुदाळतिट्टामार्गे कोल्हापूर-पंढरपूर, अशी बस वारकऱ्यांच्या मागणीनुसार सोडण्याचा निर्णय झाला. त्यानुसार मंगळवारी (ता. १७) ही बस राधानगरीतून सकाळी आठ वाजता निघाली. सरवडेसह मार्गावरील विविध गावांत वारकऱ्यांना आणि ग्रामस्थांना ही बातमी समजल्यावर त्या बसचे वाहक व चालक यांचे सत्कारही केले आणि बस धावली;
पण गाडी कोल्हापुरात पोहोचतात, पुणे मार्गावर गर्दी आहे, या कारणास्तव पंढरपूरला निघालेली गाडी कोल्हापुरातून थेट पंढरपूरला न जाता ही गाडी अधिकाऱ्याच्या आदेशानुसार पुण्याकडे गेली. त्यामुळे प्रवासी आणि वारकरी अचंबित झाले याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान, आज (ता.१८) राधानगरीतून सकाळी आठ वाजता राधानगरी-पंढरपूर बस रवाना झाली ती दुपारी दोन वाजता पंढरपुरात पोहोचली.
पंढरपूर बसमध्ये प्रवासी नसल्यामुळे ही गाडी ‘सीबीएस’वरून पुण्याला पाठवली. यापुढे ही गाडी पंढरपूरसाठी धावेल. राधानगरी आगारात गाड्या पुरेशा आहेत. परंतु, वाहक आणि चालक यांची संख्या अपुरी आहे. -प्रवीण पाटील, आगार व्यवस्थापक, राधानगरी
