इचलकरंजी/प्रतिनिधी –
भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. अनेक जाती-धर्माचे लोक या देशात गुण्या-गोविंदाने नांदत आहेत. या देशाने अनेक नैसर्गिक संकटे अनुभवली आहेत. त्या त्या संकटावेळी सर्व जाती-धर्माच्या लोकांनी आपल्या देशबांधवांसाठी धाव घेतली. मदतीसाठी लाखोंच्या संख्येने हात पुढे आले. त्यामध्ये मुस्लिम समाजाचे योगदान आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी काढले.
इचलकरंजी शहरात गत महिन्यात आलेल्या महापूराने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अनेकांचा संसार उघड्यावर पडला. अशा गरजू पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकजण आपापल्या परिने मदतीचा हात देत आहे. त्याच अनुषंगाने शहरातील पूरग्रस्तांसाठी कर्नाटक राज्यातील हिरियुर (जिल्हा चित्रदुर्ग) येथील जमियत उलमा ए हिंद यांच्यावतीने माणुसकीचा संदेश देत जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यात आली. त्याप्रसंगी अप्पर पोलिस अधिक्षक गायकवाड बोलत होत्या. 27 जीवनावश्यक वस्तू आणि 25 किलो तांदूळ असे किटचे स्वरुप आहे.
जमियत उलमा ए हिंद हिरीयुर चे अध्यक्ष मौलाना रब्बानी यांनी, अनेकांना पूराचा फटका बसला आणि त्यांचे जनजीवन विस्कळीत झाले. जगावे तर कसे? असा प्रश्न निर्माण झाला. अशावेळी अल्लाहनेच आम्हांला तुमच्या मदतीसाठी धाडले. ज्याला जे हवे ते देणारा अल्लाह आहे, आम्ही निमित्तमात्र आहोत, असे सांगितले.
पोलिस उपअधिक्षक बाबुराव महामुनी यांनी, जात-धर्म कोणताही असली तरी निसर्गाच्या प्रकोपासमोर सर्वजण सारखेच असतात. एखादे संकट ओढवले तर मदतीसाठी हात कोणासमोर पसरायचा असा प्रश्न सतावणार्यांची संख्या लक्षणीय आहे. अशावेळी केवळ सामाजिक बांधिलकी नव्हे तर माणुसकी हाच धर्म मानून मुस्लिम समाजाने गोरगरीब गरजूंना मदत देऊन खर्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडविले आहे. सामाजिक कर्तव्याची अध्यात्मिक संहिता पवित्र कुराणाने ठरवून दिलेली आहे. आधारे संकटकाळात गरजूंना आवश्यक वस्तू पुरवण्याचे जमियत उलमा ए हिंद यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
स्वागत व प्रास्ताविक सलीम अत्तार यांनी केले. आभार हाफिज फारूक यांनी मानले. याप्रसंगी कैश बागवान, पापालाल मुजावर, सपोनि गजेंद्र लोहार, हाफिज मुसा, हाफिज असगर, मौलाना मोहम्मद अली, मौलाना अयाज, मौलाना युनूस, मौलाना अब्दुल रज्जाक, मौलाना जावेद आदी उपस्थित होते.