इचलकरंजी शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध : काही काळ तणाव

ताजी बातमी / ऑनलाइन टीम

इचलकरंजी शहरात शिवसेनेच्या वतीने
वीज महावितरण कंपनीने
कोणतीही पूर्व सूचना न देता उद्योग व घरगुती वीज कनेक्शन कट केल्याचा जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला.तसेच वीज कनेक्शन कट करु नये. वीजबिलात समान हप्ते द्यावेत, या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरण कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली.यावेळी वीज महावितरण कार्यालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.

कोरोना महामारी व लाँकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षात उद्योग – व्यवसाय बंद स्थितीत होते. त्यामुळे त्यावर उपजिविका करणाऱ्या कामगारांच्या हाताला काम नाही. राज्यातील आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. त्यातच गेल्या १५ दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शहरातील पूरबाधित क्षेत्रातील अनेक उद्योगधंदे तसेच घरांचे ,प्रापंचिक साहित्याचे आणि शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

कोरोना महामारी काळात वीज महावितरण कार्यालयाकडून ५० टक्के रक्कम भरून घेतली जात होती. सध्या उद्योग, व्यवसाय सुरू झाल्याने आर्थिक घडी थोडीफार पूर्वपदावर येताना दिसत आहे. त्यामुळे शासनाने पूर क्षेत्रातील वीज कनेक्शन तोडू नयेत, असे आदेश दिले आहेत. मात्र,वीज महावितरण कंपनीकडून कोणतीही पूर्व सूचना न देता उद्योग व घरगुती वीज कनेक्शन तोडण्याचे काम चालू आहे. तसेच पूर्वीप्रमाणेच ५० टक्के रक्कम भरून घेवून वीज कनेक्शन न तोडता पूरबाधीत क्षेत्रातील सर्व ग्राहकांना वीज बिलात समान हप्ते करून द्यावे,
या मागणीसाठी आज गुरुवारी शिवसेनेच्या वतीने वीज महावितरण कार्यालयाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरण कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेवून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करुन या पुढील काळात वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, महादेव गौड, सयाजी चव्हाण, नगरसेवक रविंद्र माने, धनाजी मोरे, संजय पाटील, भरत शिवलिंगे, आप्पासाहेब पाटील, मलकारी लवटे, गणेश जंगटे ,सतीश लाटणे, दीपक आंबोले, धुळाप्पा कुंभोजे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Join our WhatsApp group