संजय गांधी निराधारांच्या याद्या जाहीर करा तातडीने बँक खात्यावर रक्कम जमा करा

इचलकरंजी/प्रतिनिधी –
संजय गांधी निराधार अनुदान योजना इचलकरंजी समितीच्या सन 2019 पासून आजतागायत झालेल्या 6 मिटींगामधील मंजूर पात्र लाभार्थ्यांची यादी तातडीने जाहीर करुन त्यांना मंजूर पत्रांसह त्यांचे प्रलंबित अनुदान तातडीने बँक खात्यावर जमा करावे, अशी मागणी नगरसेवक राजू बोंद्रे व संगांयो समितीचे माजी सदस्य कोेंडीबा दवडते यांनी अप्पर तहसिलदार शरद पाटील यांच्याकडे केली आहे.


निराधारांना आधार मिळावा या हेतुने राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना सुरु करण्यात आली आहे. त्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत दरमहा अनुदान दिले जाते. परंतु मागील 3 वर्षापासून संगांयो समितीच्या बैठका होऊनही त्यामधील पात्र लाभार्थ्यांच्या नांवाची यादी जाहीर केलेली नाही. ती त्वरीत करण्यात यावी यासाठी अप्पर तहसिलदार पाटील यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले.


निवेदनात, संगांयो समितीच्या सन 2019 मध्ये 7 मार्च, 28 जून व 30 जुलै, सन 2020 मध्ये 31 जुलै व 29 फेब्रुवारी व 30 जून अशा 6 मिटींगा झाल्या आहेत. या बैठकांमध्ये पात्र लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. परंतु अद्यापही त्यांची यादी जाहीर केलेली नाही. तसेच त्यांना मंजूर पत्रेही देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे पात्र असूनही हे लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत. चौकशीसाठी या लाभार्थ्यांना नाहक हेलपाटे मारावे लागत असून त्यांना वेळेसह आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

त्यामुळे पात्र मंजूर लाभार्थ्यांना मंजूर पत्रे देण्यासह त्यांचे प्रलंबित अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. त्यावर अप्पर तहसिलदार पाटील यांनी या संदर्भात येत्या दोन दिवसात निर्णय होऊन मंजूर पत्रांचे वाटप करण्यात येईल असे सांगितले.
शिष्टमंडळात सचिन हेरवाडे, सुखदेव माळकरी, बाबुराव जाधव आदींचा समावेश होता.

Leave a Reply

Join our WhatsApp group