इचलकरंजीतील कलाकारांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी : मागणी

इचलकरंजी/प्रतिनिधी –
मागील दीड वर्षापासून उद्भवलेला कोरोना आणि यंदाच्या महापूराच्या संकटामुळे कलाकारांचे काम बंद पडून त्यांना विविध आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शासनाने कलाकारांसाठी जाहीर केलेली प्रत्येकी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत इचलकरंजीतील कलाकारांनाही मदत मिळावी यासह विविध मागण्यांचे निवेदन इचलकरंजी व्यावसायिक कलाकार संघाच्यावतीने आमदार प्रकाश आवाडे आणि प्रांताधिकरी डॉ. विकास खरात यांना देण्यात आले.


मागील वर्षांपासून कोरोना महामारीमुळे जारी लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग-व्यवसाय बंद करण्यात आले. त्याचबरोबर गणेशोत्सव, दसरा,दिवाळी सणांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने होणारे कार्यक्रम बंद ठेवण्यात आले.परिणामी कलाक्षेत्रातील कलाकार आणि त्या क्षेत्रावर अवलंबून असणार्‍या सर्वच घटकांचे कमाईचे साधनच थांबल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवताना विविध आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.एकंदरीत ,आपल्या विविध कला सादरीकरणातून रसिकांचे मनोरंजन करत त्यांना निखळ आनंद मिळवून देणार्‍या कलाकारांच्या डोळ्यात अश्रूंशिवाय काहीच दिसत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करुन राज्य शासनाने 56 हजार कलाकारांना प्रत्येकी 5 हजार आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे.त्याच अनुषंगाने इचलकरंजी व्यावसायिक कलाकार संघाच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


निवेदनात, शासनाने कलाकारांसाठी जाहीर केलेली प्रत्येकी 5 हजारांची आर्थिक मदत मिळावी ,कलाकारांची शासन दरबारी नोंद होवून ओळखपत्र मिळावे ,अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी माजी नगरसेवक अहमद मुजावर, इचलकरंजी कलाकार संघाचे मनिष आपटे, अनिल लोकरे, रमजान बालेखान, शाहिर संजय जाधव, सौ. स्मिता घोसरवाडकर, सौ. निता ठाकुर-देसाई , सौ. काजल तोडकर , ऋतिक कुरणे, ऋषिकेश ठाकुर-देसाई, श्रीपती कोरे, मुकुंद चौगुले यांच्यासह कलाकार उपस्थित होते.

Join our WhatsApp group