इचलकरंजी/प्रतिनिधी –
7 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय विणकर दिनानिमित्त महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ मुंबई या राज्यव्यापी संस्थेमार्फत जाहीर वस्त्रोद्योग भूषण पुरस्कारांचे वितरण राज्य मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांचे हस्ते करण्यात आले.
पुरस्कार प्राप्तमध्ये विठ्ठलराव डाके (प्रोसेसिंग विभाग), विश्वनाथ मुसळे (सायझिंग विभाग), अनिल बापूसो कांबळे (पॉवरलूम विभाग), विनायकराव होगाडे (कापड प्रिंटिंग विभाग) यांचा समावेश आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथे ऑनलाईन पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. स्वागत व प्रास्ताविक मिलिंद कांबळे यांनी केले. प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती यांचा परिचय रामचंद्र निमणकर यांनी करून दिला.
सत्कारास उत्तर देताना विठ्ठलराव डाके यांनी, विणकर बांधवांनी खडतर परिश्रम करून, नवनवीन तंत्रज्ञान व प्रयोग करून वस्त्रोद्योग करावा त्यातून नक्की नफा मिळेल असे आवाहन केले.
विश्वनाथ मुसळे यांनी, सायझिंग व्यवसायधारकांनी आधुनिकतेची कास धरून व्यवसाय करावा असे आवाहन केले. विनायकराव होगाडे यांनी, परमेश्वरावर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे व निष्ठेने व्यवसाय केल्यास काहीच कमी पडत नाही असे सांगितले.
मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी, आगामी काळात वस्त्रोद्योग व्यवसायाच्या उन्नतीसाठी हा व्यवसाय आधुनिक पद्धतीने सुरू असलेल्या ठिकाणी अभ्यास दौरे काढले जातील. तसेच समाज संघटन करण्यासाठी इचलकरंजी येथे लवकरच राज्यव्यापी मेळावा घेण्यात येणार असल्याची घोषणा केली.
या ऑनलाईन सोहळ्यात विणकर बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमास महासचिव रामचंद्र निमणकर, महेशराव सातपुते, शिरीष कांबळे, सुर्यकांत लोल (वडगाव), राजेंद्र ढवळे (कोल्हापूर), शितल सातपुते, दयानंद लिपारे, अरूण वडेकर, मनोज खेतमर, पंढरीनाथ कांबळे, दिलीप भंडारे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ मुंबईचे सदस्य ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने हजर होते. आभार सौ. प्राजक्ता होगाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद कांबळे, राहुल सातपुते, अमोल सातपुते, रोहित सातपुते आदींनी परिश्रम घेतले.