आयपीएल २०२१ मधून जॉनी बेअरस्टो, बटलर आणि मलान यांची माघारसनरायझर्स हैदराबाद संघाचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो, राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर आणि पंजाब किंग्जच्या डेव्हिड मलान यांनी आयपीएल २०२१ च्या दुसर्‍या टप्प्यातून माघार घेतली आहे.

राजस्थानसाठी हा मोठा धक्का आहे, कारण आधीच त्यांचे जोफ्रा आर्चर व बेन स्टोक्स हे खेळाडू संघाबाहेर आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि अ‍ॅशेस मालिकेपूर्वी कुटुंबीयांना वेळ देता यावा, यासाठी मलानने आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्याच्या जागी एडन मार्कराम पंजाब किंग्सकडून खेळणार आहे.

भारताच्या इंग्लंड दौर्‍यावरील पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला. भारतीय संघाचे फिजिओ योगेश परमार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर हा निर्णय घेतला गेला. भारतीय संघाने या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली; पण कोरोना रुग्ण आढळल्यामुळे पाचवी कसोटी रद्द करावी लागली.

आता भारतीय खेळाडू एकेक करून आयपीएल २०२१ च्या दुसर्‍या टप्प्यासाठी यूएईत दाखल होत आहेत; पण भारताने पाचवी कसोटी रद्द केल्यामुळे इंग्लंडचे खेळाडू नाराज झाले आहेत आणि आता तर तीन खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्यामुळे आयपीएल फ्रँचायझींना मोठा धक्का बसला आहे.

मुंबई इंडियन्सचे शिलेदार दुबईत दाखल
दरम्यान, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर आणि चेतेश्वर पुजारा हे चेन्नई सुपर किंग्जचे सदस्य शनिवारी रात्री लंडन येथून दुबईसाठी रवाना झाले. त्यांच्यासोबत सॅम कुरन व मोईन अली हेही होते.

दिल्ली कॅपिटल्सचे आर अश्विन, इशांत शर्मा, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत आणि अक्षर पटेल, तर पंजाब किंग्जचे लोकेश राहुल, मोहम्मद शमी व मयांक अग्रवाल हे एमिरेटस् फ्लाईटने दुबईसाठी रवाना होतील. मुंबई इंडियन्सचे रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह व सूर्यकुमार यादव दुबईत दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Join our WhatsApp group