Friday, March 29, 2024
Homeकोल्हापूरशिरोळ तालुक्यातील शिरढोण, टाकवडे, हरोली परिसरात उडाली खळबळ

शिरोळ तालुक्यातील शिरढोण, टाकवडे, हरोली परिसरात उडाली खळबळ

शिरोळ तालुक्यातील शिरढोण, टाकवडे, हरोली परिसरात 15 जनावरांना ‘लम्पी’ची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट (alert) झाले आहे. बाधित क्षेत्रातील दहा किलोमीटर परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. हरोली व शिरढोणला काही गायींना ताप येऊन अंगावर फोड आले आहेत. त्यांनी वैरण खाणे सोडले असून, चालताना जनावरांचा तोल जात असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

हातकणंगले येथे लम्पी विषाणूजन्य आजाराची लागण झालेल्या जनावरांची संख्या जास्त आहे. शिरोळमधील हरोली येथे 6 गायी, तर शिरढोण-टाकवडे परिसरात 9 जनावरे लम्पीग्रस्त आढळली. जिल्हा प्रशासन तत्काळ शिरढोण, टाकवडे, शिवनाकवाडी, शिरदवाड, अब्दुललाट, तमदलगे व निमशिरगाव या गावांत गुरुवारपासून लसीकरणाला सुरुवात करणार आहे. शिरढोण येथे लम्पी प्रतिबंधात्मक केंद्र स्थापन केले असून, सर्व पशुवैद्यकीय अधिकारी शिरढोणला आले आहेत. शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. प्रशासन अलर्ट (alert) मोडवर आले आहे. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी परिसरात सतर्कतेचे आवाहन केले आहे.

कसबा सांगावात ‘लम्पी’सद़ृश गाय

कसबा सांगाव (ता. कागल) येथील वाकी वसाहतीतील गायीला लम्पीसद़ृश लक्षणे आढळल्याने खळबळ उडाली आहे. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना याची माहिती देण्यात आली. गायीला ताप असून, शरीरावर काही ठिकाणी ठिपके आढळले आहेत.

लम्पीचा प्रसार वेगाने वाढत आहे. याचा मृत्यू दर 10 टक्क्यांवर गेला आहे. दहा लाखच लस शिल्लक आहेत. लसींचे प्रमाण वाढवावे, अशी मागणी केंद्र व राज्य सरकारकडे केली आहे. नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक जनावराला विमा कवच द्यावे, अशी मागणी करणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

लक्षणे आढळताच प्रशासनाला कळवा

शेतकर्‍यांनी घाबरून न जाता, या आजाराचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे. लम्पीसद़ृश लक्षणे दिसून आल्यास तत्काळ आपापल्या गावांतील पशुवैद्यकीय अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचे आवाहन तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र कुरूंदवाडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -