राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज पुण्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात जय गुजरात असा नारा दिला होता. यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यानंतर खुद्द एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. मी नेहमीच जय हिंद जय महाराष्ट्र म्हणतो असे एकनाथ शिंदे म्हणाले. गुजरात पाकिस्तान आहे का? गुजरात काय पाकिस्तानमध्ये आहे का? असा सवाल यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला. मराठीच्या बद्दल कोणी आम्हाला शिकवू नये. मराठी मातीशी आम्ही जुळलो असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. त्या लोकांनी पुण्यातील लोकांसाठी काम केलं म्हणून मी त्यांची प्रशंसा केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. समोरची लोकं गुजराती असल्यानं मी जय गुजरात म्हणालो असेही शिंदे म्हणाले. यावेळी एकनाथ शिंदेंनी उद्धव (Uddhav Thackeray ) ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवरही (Aaditya Thackeray) टीका केली.
एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
मराठी हा आमचा श्वास आहे, तर हिंदुत्व आमचा आत्मा आहे. मराठीवरुन आमच्यावर जे टीका करत आहेत, त्यांच्यावर भाष्य करणार नसल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. जिनके घर शीशे के होते हैं, वे दूसरों पर पत्थर नहीं फेका करते’, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा व्हिडीओ दाखवला. यामध्ये उद्धव ठाकरे हे जय गुजरात म्हणत असल्याचे दिसत आहे. तसेच आदित्य ठाकरेंचे बॅनर देखील दाखवले, ज्यावर केम छो असा उल्लेख होता. निवडणुकीमध्ये तुम्ही पाकिस्तानी झेंडे नाचवले त्यावेळी तुमचं मराठी प्रेम कुठं गेलं होतं? असा सवाल देखील एकनाथ शिंदेंनी केला. मुंबईमध्ये जिलेबी आणि फाफडा, उद्धव ठाकरे आपणा, असं लिहलेलं पोस्टर दाखवत शिंदेंनी टीका केली.
महाराष्ट्रातील जनतेनं आम्हाला भरभरुन प्रतिसाद दिलाय
संजय राऊतांनी केलेल्या टीकेलाही एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आमच्या शिवसेनेला जनतेनं राजमान्यता दिली आहे. जनतेच्या न्यायालयात देखील शिवसेनेला 75 टक्के मते मिळाली आहेत. उबाठाला 20 टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळं खरी शिवसेना कोणाची हे समोर आलं आहे. आम्ही 80 जागा लढवून 60 जागा जिंकल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. पुढच्या निवडणुकांमध्येही आम्हाला कामाची पोचपावती मिळेल असे एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेनं आम्हाला भरभरुन प्रतिसाद दिला असल्याचे शिंदे म्हणाले.