वस्त्रोद्योगाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मला दिल्लीला पाठवा, असे सांगत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी थेट लोकसभेसाठी शड्डू ठोकल्याने खासदार धैर्यशील माने गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर आवाडे यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. (Lok Sabha) त्यानंतर अपक्ष म्हणून त्यांनी इचलकरंजीतून निवडणूक लढवली आणि जिंकलीही. त्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र राहुल यांना भाजपची उमेदवारी मिळवण्यात ते यशस्वी झाले. त्यातही त्यांनी बाजी मारून भाजपमध्ये स्वतःचा असा दबदबा निर्माण केला आहे.
सहकारी संस्थांचे मोठे जाळे आवाडे यांनी इचलकरंजी परिसरात निर्माण केले आहे. या जोरावरच ते राज्यस्तरावरील भाजप नेत्यांच्या जवळ गेले आहेत. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना डावलून मुलाला मिळवलेली उमेदवारी हा त्यांच्या राज्याच्या राजकारणातील प्रभाव दाखवून देतो. अलीकडेच त्यांनी जवाहर साखर कारखान्यांसह ते नेतृत्व करत असलेल्या अन्य संस्थांच्या नामकरण सोहळ्यासाठी थेट देशाचे सहकार व गृहमंत्री अमित शहा यांना आणून देश पातळीवरील आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवतानाच शहा यांच्याशी आपले जवळचे संबंध असल्याचा संदेशही दिला आहे.
लोकसभा ते जिल्हा परिषद अशा प्रवासात आवाडे कुटुंबाची चौथी पिढी राजकारणात आली आहे. प्रकाश आवाडे यांचे वडील कल्लाप्पाण्णा आवाडे खासदार होते, (Lok Sabha) त्यांच्या पत्नी इचलकरंजीच्या नगराध्यक्षा होत्या, ते स्वतः दोनवेळा आमदार आणि राज्यात वस्त्रोद्योगमंत्री राहिले आहेत. त्यांचे पुत्र राहुल सुरुवातीला जिल्हा परिषद सदस्य आणि आता आमदार आहेत, तर त्यांची नात सानिका आवाडे या सध्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. असा समृद्ध राजकीय वारसा त्यांच्या मागे आहे. त्या जोरावरच त्यांनी स्वतः लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
दोन दिवसांपूर्वी इचलकरंजीत झालेल्या एका कार्यक्रमातच त्यांनी मला दिल्लीला पाठवा, वस्त्रोद्यागाचे प्रश्न सोडवू, असे सांगितल्याने ते लोकसभेच्या रिंगणात उतरण्याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे; (Lok Sabha) पण त्यामुळे इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या खासदार धैर्यशील माने यांच्या गटात मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. आवाडे यांनी इचलकरंजी विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाचे राजकारण करताना सहकारी संस्थांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. सुतगिरणी, सहकारी साखर कारखाना, बँक यासह शिक्षण संस्थांच्या माध्यमातून अनेकांना रोजगाराची संधीही दिली आहे. राज्य व देश पातळीवर भाजप नेतृत्वाला आकर्षित करण्यासाठी या संस्थांचा विचार होण्याची शक्यता आहे.


