शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये पात्र बालकांना शासनाच्या बालसंगोपन आणि केंद्राच्या स्पॉन्सरशिप योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. आर्थिक मदतीसोबतच मुलांचे संगोपन कुटुंबातच व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.सध्या या १९ जिल्ह्यांतील १ हजार ५९३ पात्र बालकांना ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने’चा लाभ मिळत आहे.
तर १३३ बालकांना केंद्र सरकारच्या ‘स्पॉन्सरशिप योजने’तून मदत मिळत आहे. मात्र, योजनेसाठी पात्र असलेले अनेक बालक अद्याप लाभापासून वंचित असल्याने विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहेत.या योजनेअंतर्गत पात्र बालकांच्या संगोपनासाठी दरमहा २ हजार ५५० रुपयांचे थेट अनुदान दिले जाते.
मुलांना प्रतिकूल परिस्थितीमुळे बालगृहात जाण्याची वेळ येऊ नये आणि त्यांचे संगोपन कुटुंबातच व्हावे, यावर सरकारचा भर आहे.दरम्यान, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांनाही विशेष एकल महिला धोरणात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
