कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातल्या नांदणी मठाची माधुरी हत्तीन गेल्या 13 महिन्यांपासून गुजरात इथल्या वनतारा या ठिकाणी होती. न्यायालयीन प्रक्रिया आणि हाय पॉवर कमिटीने दिलेल्या आदेशानंतर माधुरी हत्तीनीला तिच्या स्वगृही आणण्यात आले.
वनताराचे सीईओ विवान कर्णिक यांच्या समवेत वनातराची टीम माधुरीला घेऊन नांदणी मठात दाखल झाली. या प्रवासात माधुरी मोठ्या प्रमाणावर पुष्पवृष्टी ही करण्यात आली.
दरम्यान मठाच्या परिसरात माधुरी हत्तीनीच्या स्वागतासाठी रांगोळी देखील काढण्यात आली होती तसंच नांदणी परिसरात अनंत अंबानी यांच्या आभार मानणारे हार्डिंग लावण्यात आले होते. विशेष म्हणजे माधुरी हत्तीण जेव्हा नांदणीत दाखल झाली त्यावेळेस हजारो नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत तिचे स्वागत केल.
दरम्यान, माधुरी स्वगृही परतल्याचा आनंद कोल्हापूरकरांच्या चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळणही केली.
दरम्यान 13 महिन्यांपूर्वी माधुरी ही नांदणी मठातून वनतारा येथे जाताना ग्रामस्थांनी दिलेली फळ तिने घेतली मात्र खाल्ली नव्हती. शिवाय तिच्या डोळ्यातून अश्रूही आले होते.
मात्र आज स्वगृही माधुरी परतताच तिनं नव्या घरात ठेवलेली फळ आणि ऊस तिने खाल्ला. यावेळी माधुरी देखील आपल्या स्वगृही परतल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरही दिसत होता.
