मागील काही काळात झालेली इंधन दरवाढ, यंदा कमी असलेला पाऊस व त्यामुळे घटलेले उत्पादन याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. गेल्या ९ महिन्यांत प्रमुख डाळी, साखर यासह किराणा वस्तु तब्बल १५ ते २० टक्क्यांनी महागल्या आहेत.
भगरीचे दर दुप्पट झाले आहेत.
बाजारातील घाऊक व किरकोळ विक्रेत्यांच्या माहितीनुसार मसूर डाळ, तूर डाळ, उडीद डाळ, चणा डाळ, मूग डाळ, हरभरा, चवळी, मटकी आणि वाटाणा यांच्या दरात १० ते ३० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्याचबरोबर शेंगदाणे, साखर, गहू, तांदूळ आणि बाजरीच्या दरातही वाढ झाली आहे. किरकोळ भावानुसार जानेवारीत ८० रुपये असलेली हरभरा डाळ सध्या ९० रुपये किलो आहे. याशिवाय तूर डाळ १२० वरून १४० वर गेली आहे. उडीद दाळीचे भावही याच प्रमाणात वाढले आहेत.
साखर महागली, मिठाई दरात २५ टक्के वाढ गेल्या सहा महिन्यांत साखरेच्या भावात थेट दुप्पट वाढ झाली. आता त्यात सरकारने हस्तक्षेप करत भाव कमी केले आहेत. परंतु तरीही सहा महिन्यांच्या तुलनेत भाव ५० टक्के वाढलेलेच आहेत. ४० रूपयांवरून साखर ८० रूपयांपर्यंत केली होती. सध्या साखरेचे दर ५५ ते ६० रुपये किलो आहेत.
डाळीचे किरकोळ दर (प्रतिकिलो)
हरभरा डाळ – जानेवारी ८० रुपये, सप्टेंबर – ९० रुपये
तूर डाळ – जानेवारी १२० रुपये, सप्टेंबर – १४० रुपये
मसूर डाळ – जानेवारी ९० रुपये, सप्टेंबर – १०० रुपये
मूग डाळ – जानेवारी ११० रुपये, सप्टेंबर – १३० रुपये
उडीद डाळ – जानेवारी ११० रुपये, सप्टेंबर – १३० रुपये
साखर – जानेवारी ४० रुपये, सप्टेंबर – ६० रुपये
भगर – जानेवारी ११० रुपये, सप्टेंबर – २२० रुपये
पारंपरिक मिठाईला मोठी मागणी गणेशोत्सवात मोदक, पेढे आणि असते. मात्र यंदा वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे मिठाई विक्रेत्यांनी भावात वाढ केली आहे. साखर आणि गुळाच्या भावात झालेल्या वाढीचा परिणाम मिठाईच्या किमतीवर झाला आहे. मिठाईच्या किमतीत किमान २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यातच खोबरे, खवा, तूप, दूध, सुकामेवा यांसारख्या कच्च्या मालाच्या किमती आणि कामगारांचा खर्चही वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
