ज्युनिअर कॉलेजला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला मैत्री करण्याचे आमिष दाखवून तिचा पाठलाग करून छेड काढणाऱ्या खासगी शाळेच्या बसचालकाला नातेवाईक व नागरिकांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. फिरोज शमशुद्दिन नदाफ (वय २६, रा. कसबा सांगाव, कागल) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी गावभाग पोलिस ठाण्यात नदाफ याच्याविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कसबा सांगाव येथे राहणारा फिरोज नदाफ हा गेल्या वर्षापासून शहरातील एका नावाजलेल्या खासगी शाळेच्या बसवर चालक म्हणून काम करत आहे. २-३ महिन्यांपासून तो अल्पवयीन मुलीला त्रास देत होता. चॉकलेट देतो, मैत्रीच्या नात्याने बोलू, तुझा इन्स्टा आयडी दे, अशी पीडित मुलीकडे वारंवार मागणी करत होता. तसेच तो मुलीच्या घरापर्यंत पाठलागही करत होता.
यामुळे संतप्त पालक व नातेवाइकांनी नदाफ याला पकडून त्याला बेदम चोप दिला. याबाबतची माहिती कळताच गावभाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नदाफ याला ताब्यात घेत अटक केली. दरम्यान, नदाफ याने आणखी काही अल्पवयीन मुलींना सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क करून त्यांना त्रास देत असल्याची चर्चा घटनास्थळी होती. पोलिस उपनिरीक्षक एस. एस. चंदन हे अधिक तपास करत आहेत.

