आजारपणाला कंटाळलेल्या मुलाने आधी वृद्ध आईची गळा आवळून हत्या (Murder) करुन मग स्वतः गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना सांगलीतील आष्टा येथील दत्त वसाहतीत घडली आहे. रतन रामचंद्र कांबळे (80) असे हत्या करण्यात आलेल्या आईचे तर शशिकांत कांबळे (47) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. शशिकांत कांबळे यांना दम्याचा त्रास होत आहे त्यामुळे ते सतत आजारी असत. याच आजारपणामुळे त्यांना नैराश्य आले होते. शशिकांत यांच्या पश्चात पत्नी व मुले आहेत. पत्नी मुलांसह माहेरी गेली असताना घरी कुणी नाही याची संधी साधत शशिकांत यांनी आईसह स्वतःचे जीवन संपवले. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात हत्या व आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. आष्टी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सांगलीच्या आष्टा येथील दत्त वसाहतीमध्ये कांबळे कुटुंबिय राहतात. शशिकांत यांचे वडिल रामचंद्र कांबळे आणि आई रतन कांबळे हे दोघेही प्राथमिक शाळेत शिक्षक होते. वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तर मयत शशिकांत यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. आष्टा शहरात शशिकांत यांचे कपड्याचे दुकान आहे. शशिकांत यांची पत्नी मुलांसह मंगळवारी माहेरी गेली होती. त्यामुळे घरी शशिकांत व त्यांची आई दोघेच होते. आजारपणाच्या नैराश्येतून त्यांनी कॉटवर विश्रांती घेत असलेल्या आईची नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर दुसऱ्या खोलीत जाऊन स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. शशिकांत यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून यात माझ्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे. आईला सांभाळण्यास कोणी नसल्याने मी आईला माझ्यासोबत घेऊन जात आहे, असे लिहिले आहे.