ताजी बातमी ऑनलाईन टीम
रत्नागिरी नागपूर मार्गावर आज भीषण अपघात झालेली घटना घडली भरधाव निघालेली कार पलटी होऊन झालेल्या अपघातात डॉ. अरूण राजाराम मोराळे (वय ६६, रा. एसएससी बोर्ड, रिंग रोड, मनिषानगर, कोल्हापूर) हे जागीच ठार झाले. ही घटना रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय मार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी गावाजवळ शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.
डॉ. मोराळे हे आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागात (१०८ रूग्णवाहिका) झोनल मॅनेजर होते. दरम्यान ते शुक्रवारी सकाळी कार (क्र.एम.एच.०९ डी.एक्स.४६४४) ने कोल्हापूरहून लातूरला मिटिंगला निघाले होते. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय मार्गावर विठ्ठलवाडीजवळ भरधाव निघालेली कार दोन्ही रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या ढिगाऱ्यावरून दोनदा पलटी होऊन सुमारे चारशे फुटांवर रस्त्याच्या उजव्या बाजूला विरूद्ध दिशेला तोंड करून उभारली. कारमध्ये मागच्या बाजूला बसलेल्या डॉ. मोराळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांची कवटी फटली. त्यामुळे ते जागीच ठार झाले. तर कारचा चालक सोहेल सलीम शेख (वय २९, रा. कोल्हापूर) यालाही किरकोळ इजा झाली आहे.