मिरजजवळील बेडग रस्त्यावरील महानगरपालिकेचा बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प कोकण केअर एंटरप्रायजेसला चालविण्यास देण्यास ‘आयएमए मिरज’ने विरोध केला आहे. आयएमए मिरज या संस्थेलाच हा प्रकल्प चालविण्यास द्यावा, अशी मागणी महापौर, जिल्हाधिकारी, आयुक्तांकडे केली आहे. शासन निर्णय आणि प्रकल्पाच्या त्रुटी पुर्ततेसाठी केलेल्या 80 लाखांच्या गुंतवणुकीकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
महापालिका क्षेत्रातील शासकीय व खासगी दवाखाने विविध लॅब आदींमधून दैनंदिन निर्माण होणार्या जैविक कचर्याची (बायोमेडिकल वेस्ट) शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी बेडग रोडवर महापालिकेच्या जागेत बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प (कॉमन इन्सिनेटर प्रकल्प) उभारण्यात आलेला आहे. महापालिकेने मिरज आयएमए यांना 10 वर्षे मुदतीने हा प्रकल्प चालविण्यास दिला होता. साधारणपणे एक वर्ष काम सुरू राहिले. मात्र त्यामध्ये त्रुटी निदर्शनास आणण्यात आल्या. प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता रखडली.
दरम्यान, प्रकल्प बंद राहिल्याकडे लक्ष वेधत भाजप सत्ताकाळात महापालिकेने हा प्रकल्प आयएमए पुलाची शिरोली यांना दरमहा 40 हजार रुपये महापालिकेस रॉयल्टी भरण्याच्या अटीवर 15 वर्षे मुदतीने देण्याचा ठराव केला. दि. 20 जानेवारी 2021 च्या महासभेत हा ठराव झाला. दरम्यान, दि. 23 फेब्रुवारी 2021 रोजी महापालिकेत सत्तापरिवर्तनानंतर राष्ट्रवादीने हा प्रकल्प आयएमए पुलाची शिरोली यांना चालविण्यास देण्याचा ठेका रद्द केला. तो आयएमए मिरज यांना देण्याचा विषय दि. 12 मे 2021 च्या महासभेपुढे आणला. तो ठराव मंजूरही केला. मात्र विलंबाचे कारण देत ऑक्टोबर 2021 रोजी हा प्रकल्प कोकण केअर एंटरप्रायजेस यांना चालविण्यास देण्याचा ठराव केला.
हा प्रकल्प ‘कोकण केअर’ला चालविण्यास देण्यास ‘मिरज आयएमए’ने विरोध केला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने सूचवलेल्या त्रुटींच्या पूर्ततेसाठी ‘आयएमए मिरज’ने सुमारे 80 लाखांचा निधी खर्च करून उपाययोजना केल्या आहेत. त्रुटी पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी मिळवून आयएमए मिरज यांना वर्क ऑर्डर देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे, असे आयएमए मिरज यांनी म्हटले आहे.