सोरडी (ता. जत) येथील जिल्हा परिषद शाळेतील एका वर्गखोलीच्या छताचे प्लास्टर कोसळल्याने एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला. नशीब बलवत्तर म्हणून प्लास्टर बेंचच्या पुढील बाजूस पडल्याने सुदैवाने विद्यार्थ्यांना मोठी इजा झाली नाही. हा प्रकार निकृष्ट बांधकामामुळे घडला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार , शाखा अभियंता व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे.
किरकोळ जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आराध्य आरुण आभ्यागे (वय ७)असे आहे. ही घटना शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सोरडी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता १ ते ७ वी पर्यंतचे वर्ग भरतात. इयत्ता पहिलीच्या वर्ग खोलीच्या स्लॅबचा सीलिंगचा काही भाग कोसळला. हा भाग बेंचच्या पुढील बाजूवर पडला. यात एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला. दरम्यान, प्रसंगावधान दाखवत शिक्षकाने विद्यार्थ्यांना तत्काळ व्हरांड्यात जाण्यास सांगितले.