सध्या तरुण पिढीला सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात नाद लागला आहे. या सोशल मीडियामुळे काही जणांना आपली ओळख मिळाली आहे तर काही जणांना याच सोशल मीडियापायी आपला जीव गमवावा लागला आहे. अमरावती जिल्ह्यातील कुष्टा शेत शिवारात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कुष्टा गावातील शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 13 वर्षीय मुलीसह तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.
कुष्टा शेत शिवारातील शेत तळ्यावर सेल्फी घेत असताना 13 वर्षीय हर्षा वांगे पाण्यात बुडाली. यावेळी हर्षा वांगेला वाचवण्यासाठी 25 वर्षांच्या बाजीलाल कासदेकर याने देखील पाण्यात उडी घेतली. मात्र शेत तळ्यावर पंनी लागली असल्याने त्यांना बाहेर निघता आले नाही त्यामुळे या दोघांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. यानंतर पोलीस आणि बचाव पथकाच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून हे मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवले.
शेततळ्यावरील व्हिडीओ बाजीलाल हा सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ बनवत होता. हे दोघे शेततळ्यावर व्हिडीओ बनवून लोकांचे मनोरंजन करत होते. मात्र दुर्दैवाने या दोघांना त्याच शेततळ्यात जलसमाधी मिळाली आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. “किस्सा नहीं, कहानी बन गई” हा व्हिडिओ बाजीलालचा अखेरचा व्हिडिओ ठरला आहे.