शहरातील आहिल्यानगर भागात राहणाऱ्या एका (२९) वर्षीय विवाहतेवर लग्नाचे आमिष दाखवून एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसांत आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर दिलीप मोरे (वय ३२) राहणार राजपिंप्री (गेवराई) असे सदर गुन्ह्यातील आरोपीचे नाव आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपीचे राजपिंप्री (गेवराई) येथील भागात कापड दुकान आहे. पीडित महिला दुकानात कपडे खरेदीसाठी गेली असता, तिला कपडे दाखवण्याच्या बहाण्याने अश्लील भावनेतून स्पर्श केला. तसेच तुम्ही माझ्या दुकानात पहिल्यांदाच आला आहात, चहा घेऊया असे म्हणून बराच वेळ थांबवून घेतले. तसेच कपड्याचे बील तयार करून सदर महिलेकडे मोबाईल नंबर मागितला. मला फोनवर तुमच्याशी महत्वाचे बोलायचे आहे, भेटायचे असे अश्लील बोलणे केले.
त्यानंतर सदर आरोपीने पीडितेला शासकीय आयटीआय परिसरात बोलावले. त्याठिकाणी गेल्यानंतर तुम्ही माझ्या दुकानात आल्यापासुन माझ्या स्वप्नात येता असे सांगून पीडितेच्या अंगाला स्पर्श केला. तसेच त्या पीडितेवर इच्छा नसतानाही अतिप्रसंग केला. या घटनेनंतर ती पीडिता त्या ठिकाणाहून निघून गेली. पुन्हा सदर आरोपीने पीडित महिलेला त्रास द्यायला सुरूवात केली. आरोपी पीडितेला फोन करून बोलू लागला की, “तू जर नाही आली तर, मी तुझ्या घरी येईन. नवीन बसस्थानकावर गेले असता बळजबरीने रिक्षात बसवून लॉजवर घेऊन जाऊन माझ्या इच्छेविरूद्ध माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले. पीडितीने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता, जर ही गोष्ट तू कोणाला सांगितलीस तर, तुला जिवे मारून टाकीन अशी धमकी आरोपीने पीडितेला दिली.