ताजी बातमी ऑनलाईन टीम
शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी येथे परप्रांतीय कामगाराची किरकोळ वादातून निर्घृण हत्या (murder) झाल्याची घटना घडली आहे. अक्षय गावकर (वय २९, रा. रामनगर, ता. जोयडा, जि. कारवार, राज्य कर्नाटक) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी सहदेव थाणु यादव (मु. कोटवारटिह, पो. चंदवारा, ता. चंदवारा, जि. कोडरमा, राज्य झारखंड) याला शाहूवाडी पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे. शिवीगाळ केल्याने राग अनावर होऊन हत्या केल्याची पोलिसांना आरोपीने कबुली दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय मार्गालगत म्हसोबा पॅाईंट परिसरात बॉक्साईट संकलनाचा ठिय्या आहे. येथे भूमी रिसोर्सेस प्रायव्हेट लि. या कंपनीच्या माध्यमातून कार्यरत मशिनरीवर कर्नाटक राज्यातील अक्षय गावकर हा परप्रांतीय तरुण व्हील लोडर म्हणून तसेच झारखंड राज्यातील सहदेव यादव हा पोकलँड ऑपरेटर म्हणून काम करतात. संबंधित दोघांमध्ये शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास उद्भवलेल्या वादात यादव याला आई बहिणीवरून अक्षय गावकर याने अश्लील शिवीगाळ केल्याने याचा राग अनावर झालेल्या यादवने केबिनजवळच पडलेली लोखंडी पाईप घेऊन अक्षय गावकर याच्यावर हल्ला चढवला. यामध्ये कपाळावर, डोळ्याजवळ तसेच डाव्या कानाच्या मागे वर्मी घाव बसल्याने अक्षय गावकर हा जागीच ठार (murder) झाला.
दरम्यान, हल्लेखोर सहदेव यादव याला पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले असून शनिवारी दुपारी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. याबाबत भूमी रिसोर्सेस प्रायव्हेट लि. या कंपनीचे सुपरवायझर बसवराज कल्लाप्पा पाटील (वय ३९, मुळ पत्ता सिंगीगखोप, ता. खानापूर, जि. बेळगाव, सध्या रा. शाहूवाडी, ता. शाहूवाडी) यांनी फिर्याद दिली. शाहूवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय पाटील यांनी वरिष्ठांना घटनेची माहिती दिली असून शाहूवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र साळोखे यांनी रात्री उशिरा तातडीने घटनास्थळी भेट देऊन अन्य कामगारांकडून घटनेची माहिती घेतली.