सोलापूर जिल्हा परिषदेने शाळांमध्ये शिक्षकांना मोबाईल वापरण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना शिकवतांना शिक्षकाने मोबाईल वापरू नये असा नियम जिल्हा परिषदेने तयार केला आहे. त्यामुले जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकाने मोबाईल वापरला तर त्याच्यावर शालेय व्यवस्थापन समितीकून मोबाईल जप्तीची कारवाई केली जाऊ शकते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून शिक्षकांना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेने तयार केलेल्या नव्या नियमानुसार शाळांमध्ये शिक्षकांना आता मोबाईल वापरता येणार नाही. शाळेतील स्टाफरूम वगळता इतर ठिकाणी शाळेच्या वेळेत मोबाईल वापरणाऱ्या शिक्षकांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यासाठी शालेय व्यवस्थापन समितीकडून दंडाची रक्कम निश्चित केली जाणार आहे. जिल्हा परिषदेचा हा निर्णय जून 2022 पासून लागू करण्यात येणार आहे.
शाळेत विद्यार्थ्यांना शिकवत असताना शिक्षकाला फोन किंवा मेसेज आल्यास अध्यापनात अडथळा येऊ शकतो. तसेच वर्गात मुलांसमोर असताना शिक्षक मोबाईलवर बोलत असेल तर त्यामुळे मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे शिक्षक मोबाईल वापरत असतील तर मुलं देखील वर्गात मोबाईल घेऊन येऊ शकतात. यामुळे गुणवत्ता वाढीच्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकांचा मोबाईलमध्ये वेळ जाऊ नये. यासाठी शिक्षकांनी त्यांचा मोबाईल बॅगमध्ये किंवा स्टाफरूममध्ये ठेवावा असे सांगण्यात आले आहे.