मनसे ही भाजपची ‘सी; टीम आहे, अशी टीका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी केली होती. आदित्य यांच्या या टीकेचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे. त्यांना माझा सवाल आहे की तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची कितवी टीम आहात? तुम्ही एका पदासाठी कोणती टीम झाला आहात? एक मुख्यमंत्रीपद देऊन पक्षाची काय अवस्था केली आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्यावरही टीका केली.
राऊतांनी वर्षभर असे अनेक हस्यास्पद आरोप सोमय्यांवर लावले आहेत. पण ते कुठलाच आरोप सिद्ध करू शकले नाहीत. त्यांनी इतका प्रयत्न केला, पोलिसांवर दबाव आणला मात्र काही हाती लागलं नाही. चुकीची कारवाई कारता येणार नाही हे त्यांना सांगितले आहे. आता जे सुरू आहे, त्याचाच एक प्रयत्न आहे. ते आता पुढे काय करतील, कुठच्या कोर्टात जातील हे आम्हाला माहीत आहे. त्यांना काहीही करू देत भ्रष्टाचार बाहेर काढणं भाजप आणि किरीट सोमैय्या सोडणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाविकास आघाडी सोबत जाण्याचा त्यांचा निर्णय चुकीचा होता. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांच्या राजकारण्याला विरोध केला म्हणून त्यांच्या मागे माणसं पाठवली. त्यांनी जो निर्णय घेतला तो योग्य आहे. त्यांना सोबत घेऊन संपवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला. त्यांना हे कळलं. त्यांची प्रतिमा देखील मलीन करण्यात आली. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. ते आमच्या विरोधात बोलतील तो त्यांचा प्रश्न आहे, असं फडणवीस म्हणाले.