भारतात घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात सिमेंटचा वापर केला जातो. याचबरोबर देशभरात रोड डेव्हलेपमेंटची कामे ही जोरदार सुरू आहेत. दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे सुरू असताना अचानक एसीसी आणि अंबुजा सिमेंट निर्मीती करणारी कंपनी होल्कीम ग्रुपने भारत सोडून जाणार आहे. याबाबत बिझनेस टाईम्सने माहिती दिली आहे.
भारतातील १७ वर्षांत उभारलेला पसारा आवरण्याची तयारी होल्कीमने सुरु केली आहे. या कंपनीने कोअर मार्केटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ग्लोबल स्ट्रॅटेजी तयार केली आहे. यानुसार भारतातून बाहेर पडणे हे या धाेरणाचाच भाग आहे.
होल्कीम ग्रुपकडून अंबुजा आणि एसीसी या भारतातील लिस्टेड कंपन्यां विक्रीला काढल्या आहेत. होल्कीम ग्रुपकडून जेएसड्ब्लू आणि अदानी ग्रुपसह अन्य कंपन्यांशी चर्चा करत आहे. जेएसडब्ल्यू आणि अदानी यांनी काही काळापूर्वीच सिमेंट उद्योगात एन्ट्री केली आहे. दोन्ही उद्योग समुहांनी या उद्योगात मोठी झेप घेण्याची तयारी केली आहे.
सध्या भारतात आदित्य बिर्ला यांची अल्ट्राटेक कंपनी एक नंबरवर आहे. त्यांचे वर्षाला११७ दशलक्ष टन सिमेंटचे उत्पादन होत असल्याची माहिती आहे. तर एसीसी आणि अंबुजा या कंपन्याकडून ६६ दशलक्ष टन आहे. दरम्यान ज्यांच्याकडे याची मालमत्ता जाईल त्यांना याची मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे.