महाराष्ट्रात पारा वेगाने वर चढत असून उष्णतेची लाट आता राज्यभर पसरतेय. आधीच महागाईने आर्थिक स्वास्थ्य हिरावून घेतले आहे. अशातच आता उन्हाळा शारीरिक स्वास्थ हिरावून घेत आहे. या उष्णतेच्या लाटेमुळे आतापर्यंत 2-3 व्यक्तींचा मृत्यूच्या घटना राज्यात घडल्या आहेत.
वाढत्या उन्हामुळे ग्रामीण तसेच शहरी भागात राहणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्रात वातावरण फार विचित्र झाले आहे. कुठे पाऊस तर कुठे उन्हाने घामाच्या धारा निघत आहेत. अशातच विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील 4 दिवस काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अतिआवश्यक असल्याशिवाय दुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार विदर्भातील यवतमाळ (Yawatmal), चंद्रपूर (Chandrapur), वर्धा (Wardha), अकोला (Akola) चार जिल्ह्यांमध्ये आजपासून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात या महिन्यातील तिसरी उष्णतेची लाट आली असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबई उपनगरांसह कोकण विभागात पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
यंदाचा एप्रिल महिना देशातील उकाड्याचे सर्व विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. भारतातील आतापर्यंतचा सर्वात उष्ण एप्रिल होण्याच्या मार्गावर आहे. साधारणपणे मे महिन्याच्या मध्यानंतर जेवढं तापमान असतं तेवढं तापमान एप्रिल महिन्यात वाढलं आहे.