अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऑनलाइन प्रवेशासाठी भरावा लागणारा सराव अर्ज आता 17 मे ऐवजी 23 मे पासून भरता येणार आहे. याबाबतचे सुधारीत वेळापत्रक लवकरच जारी करण्यात येणार आहे. दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी सराव अर्ज भरण्याची प्रक्रिया 17 मे पासून सुरु होणार होती. पंरतु, आता दहावीचा निकाल 20 जूनदरम्यान जाहीर होण्याची शक्यता असल्याने अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील कनिष्ट महाविद्यालयांमध्ये यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याचा सराव व्हावा आणि अर्ज भरण्यास काहीही अडचण येऊ नये यासाठी 17 मे पासून सराव अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार होती. परंतु आता त्यात बदल करण्यात आला आहे. आता ही प्रक्रिया 23 मे पासून सुरू होणार आहे.
विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव झाल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला भाग भरता येईल. तसेच 20 जून नंतर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना या अर्जाचा दूसरा भाग भरता येईल आणि महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवता येईल.
अकरावी प्रवेशाचा अर्ज कसा भरावा असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असल्याने विद्यार्थ्यांना सुरुवातीला सराव अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या 23 मे पासून विद्यार्थी https://11thadmission.org.in/ या वेबसाईटवर जाऊन अकरावीचा सराव अर्ज भरू शकतील. या दिवशी प्रवेशासाठी कॉल सेंटर देखील सुरू करण्यात येणार आहे. अर्ज भरताना काही अडचण आल्यास विद्यार्थ्यांना थेट या कॉल सेंटरवर कॉल करून आपली अडचण सोडवता येणार आहे.





