ताजी बातमी ऑनलाईन टीम
अनैतिक संबंधांतून जन्माला आलेल्या एका अर्भकाला त्याच्या आईनेच प्रियकराच्या मदतीने सार्वजनिक शौचालयाच्या भांड्यात टाकून दिल्याचा भीषण प्रकार उघडकीस आला; मात्र, पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन या बाळाचा जीव वाचविला.
सिंहगड रोड परिसरातील वडगाव बुद्रुक येथील तुकाईनगरमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी बजाविलेल्या कामगिरीमुळे त्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. तुकाईनगरच्या सार्वजनिक महिला शौचालयात एक महिला या अर्भकाला टाकून निघून गेली. त्यानंतर शौचालयात गेलेल्या दुसऱ्या महिलेला बाळाचा रडण्याचा आवाज आला. तिने तत्काळ पोलिस कंट्रोल रूमला सकाळी आठ वाजता याची माहिती दिली.
सिंहगड पोलिस ठाण्यात ड्युटीवर असलेले पोलिस अंमलदार अजय माळी व अमोल कट्टे यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहणी करताच त्यांना त्या शौचालयातील भांड्यात अर्भक रडत असल्याचे आढळले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नागरिकांच्या मदतीने हे चिमुकले बाळ भांड्यातून वर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अर्धे भांड्यात, तर अर्धे लाईनमध्ये अडकले असल्यामुळे त्याला बाहेर काढणे मुश्कील होते. त्यातच बाळाला जखम झाल्याने रक्तस्रावदेखील होत होता. शेवटी कर्मचाऱ्यांनी तेलाचा वापर करून त्या बाळाला भांड्यातून बाहेर काढत त्याचा जीव वाचविला. बाळाला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.