ताजी बातमी ऑनलाईन टीम
युवा पिढीने छत्रपती शिवाजी, शाहू व फुले-आंबेडकर यांच्या विचारापासून प्रेरणा घ्यावी शिव-शाहु-फुले-आंबेडकर यांची विचारांनी नेहमीच प्रेरणा दिली. लोकराजा शाहुंचे प्रेरणादायी विचार अधिक लोकांपर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्रात जनजागरण यात्रा होणार असल्याची माहिती गृहनिर्माण, अल्पसंख्याक विकास मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
निर्मिती विचारमंच, कोल्हापूर आयोजित राजर्षी शाहू स्मृती शताब्दीनिमित्त राजर्षी शाहू विचार संमेलन, दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात आयोजित करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. या संमेलनास स्वागताध्यक्ष माजी आमदार राजू आवळे, आदिल फरास, विजय चोरमारे, डॉ. कपिल राजहंस, अनिल म्हमाने, डॉ. शोभा चाळके-म्हमाने आदी उपस्थित होते.
गृहनिर्माण मंत्री आव्हाड पुढे म्हणाले की, कोल्हापूरात छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणा व विचारांनी जगणारी माणसं आहेत.
लोकराजा शाहूच्या विचारांना उजाळा देत त्यांनी राबविलेल्या शिक्षणासाठी सुविधा, समाजातील सर्व घटकांतील मुला-मुलींसाठी निवासी वसतीगृह, खेळातील आवड व योगदानाबाबत त्यांच्या स्मृती शताब्दी निमित्त त्यांना मानवंदना दिली. सर्वांनी समतेचा विचार जोपासावी तसेच छत्रपती शिवाजी, शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचारां – प्रेरणा आजच्या युवकांनी घ्यावी, असे आवाहन ही त्यांनी केले.
विधवा प्रथेचे उच्चाटन करणाऱ्या कोल्हापूर जिह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचे विशेष कौतुक असून शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथेबाबत जो सकारात्मक उपक्रम राबविला तोच उपक्रम राज्यातील इतर ग्रामपंचायतीने राबवून विधवा प्रथेचे समूळ उच्चाटन करून विधवा महिलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना इतर सर्वसामान्य स्त्रिया प्रमाणे जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहनही श्री. आव्हाड यांनी केले.
राजर्षी शाहू विचार संमेलनाचे उद्घाटक ना. जितेंद्र आव्हाड यांनी भारतीलय संविधानाची प्रास्ताविका वाचून दाखविली. श्री. आव्हाड व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजर्षी जीवन गौरव पुरस्कार 2022 हा पुरस्कार यावेळी डॉ. श्रीपाद देसाई, इंद्रजित सावंत, भरत लाटकर, स्मिता गिरी, अनंत हावळ, यांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘भीमाची लेकरं’ या ओंकार सुतार लिखित व निर्मित गाण्याचं पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. डॉ. कपिल राजहंस संपादित सर्वव्यापी शिवराय या ग्रंथाचा प्रकाशनवेळी विद्याधन कांबळे, रशीद मोमीनचाचा, समीर मोमीन यांचाही सन्मानचिन्ह सत्कार करण्यात आला.