ताजी बातमी ऑनलाईन टीम
अमरावती; अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा (Rana Couple) यांच्यासह युवा स्वाभिमान पार्टीच्या १०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांवर नांदगाव पेठ, गाडगेनगर, शहर कोतवाली आणि राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी विना परवानगी राणा दाम्पत्यानी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच रात्री बारा वाजेपर्यंत विना परवानगी लाऊड स्पीकर लावल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा पठणासाठी २२ एप्रिल रोजी राणा दाम्पत्य (Rana Couple) मुंबईत गेले होते. शनिवारी तब्बल ३६ दिवसानंतर ते अमरावतीत परतले. शहरात गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पंचवटी चौकातून त्यांची खुल्या जीपमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
राजकमल चौक येथे त्यांचे युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. राजापेठ परिसरातील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करण्यात आले. यानंतर शंकरनगर स्थित राणा यांच्या निवासस्थानी राणा दाम्पत्याचा दुग्धाभिषेक करण्यात आला. रात्री बारा वाजेपर्यंत लाऊड स्पीकर लावून हा संपूर्ण गोंधळ सुरू होता. त्यामुळे नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी त्यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.