भोंग्यांवरून वादंग होत असताना खेराडेवांगी येथे मात्र भोंग्याचा अभिनव वापर केला जातो आहे. रोज सायंकाळी गावात भोंगा वाजतो अन् सर्व टीव्ही बंद केले जातात. शालेय विद्यार्थी अभ्यासाला बसतात. राज्यासाठी आदर्शवत असाच हा उपक्रम ठरत आहे.
राज्यात भोंग्यावरून उलटसुलट राजकारण होत आहे. खेराडेवांगी येथे मात्र यासाठी अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. गावातील प्राथमिक शाळेवर गावकऱ्यांनी हा भोंगा बसविला आहे. हा भोंगा दररोज संध्याकाळी सात वाजता वाजविण्यात येतो. यानंतर गावातील सर्वच घरातील टी.व्ही. बंद करण्यात येतात. सर्व मुले अभ्यासाला बसतात. आठपर्यंत म्हणजे एक तास मुले अभ्यासात मग्न असतात. गावात गेल्या काही महिन्यांपासून हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाचे सध्या स्वागत होत आहे.