ताजी बातमी ऑनलाईन टीम
नवी मुंबई : नवी मुंबईतल्या कामोठेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाच कोटींचे लोन (Loan) देण्याच्या बहाण्याने 10 लाखांची फसवणूक झाली आहे. यात मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या नावाचा वापर करत ही फसवणूक केली गेली आहे. तसेच या भामट्याने बंटी पाटील यांचा PA असल्याचे सांगून हा गंडा घातला आहे. आता मात्र लोन मिळवून देणारा फरार झाला आहे. तसेच त्याचा पत्ता आणि नावही खोटे असल्याची माहिती समोर आली आहे. फसवणूक करणारा विनायक रामगुडे उर्फ विनायक पाटील हा आता फरार झाला आहे. या भामट्याने सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचा PA असल्याचे फोनकरून भासविले. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा 34,420 कलमांतर्गत दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकाराने सध्या नवी मुंबईत खळबळ माजली आहे. या भामट्याचा शोध सध्या नवी मुंबई पोलिसांकडून सुरू आहे.
नेत्यांची नावं घेऊन आधीही फसवणूक
एखाद्या नेत्याच्या नावाने फसवणूक होण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. मागेही पुण्यात असेच एक प्रकरण समोर आलं होतं ज्यात अजित पवार यांच्या नावाचा वापर केला होता. तसेच अजित पवार यांच्या सचिवाच्या मोबाईल नंबरचाही वापर करून खंडणी मागितली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने पाऊलं उचलत या भामट्याला बेड्या ठोकल्या होत्या. हे प्रकरणही राज्यभर गाजलं होतं. एखाद्या मोठ्या नेत्याचं नाव घेऊन फसवणूक केल्यास अशी प्रकरण पोलिसांकडूनही तात्काळ हातळली जातात. त्यामुळे याही प्रकरणाचा छडा लवकरच लागण्याची शक्यता आहे.