भारतीय वाहन क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक गाडयांना चांगले दिवस आले आहेत असं वाटत असलं तरी हा आनंद जास्त काळ टिकण्याची शक्यता कमी आहे. कारण इलेक्ट्रिक वाहनांना आग लागल्याच्या घटना सातत्याने बघायला मिळताना दिसल्या आहेत. टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक कारला आग लागल्याची घटना चांगलीच व्हायरल झाली असताना आता तर अख्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या शोरूमलाच आग लागल्याने चिंतेत भर पडली आहे.
इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणाऱ्या ओकिनावा कंपनीचे एक आगीत जळून अक्षरशः खाक झाले आहे. ही घटना कर्नाटकातील मंगळुरु शहरात घडली आहे.ओकिनावा ऑटोटेकच्या शोरूमला अचानक आग लागली आणि शोरुममध्ये उभी असलेली जवळपास सर्वच वाहने जळून खाक झाली आहेत.
ओकिनावा कंपनीच्या शोरूमला आग लागण्याची ही पहिलीच वेळ नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चेन्नईतील ओकिनावा ऑटोटेकचं शोरूमही अशाच एका घटनेमुळं जळलं होतं. मागच्या महिन्यात ऍथर एनर्जी या इलेक्ट्रिक दुचाकी निर्मात्या कंपनीच्या शोरूमध्येच इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली होती. ओकिनावाच्या शोरूमला आग लागण्याच्या घटनेनंतर ओकिनावाच्या ग्राहकांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे.
ही घटना घडल्यानंतर शोरूमच्या मधून आगीचे लोटच्या लोट बाहेर पडत होते. अचानक लागलेल्या या आगीमध्ये कसलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र बहुतांश इलेक्ट्रिक स्कुटर या जळून खाक झाल्या. आगीच्या या घटनेनंतर ओकिनावा ऑटोटेकने त्यांचं निवेदन जारी करत म्हटलं आहे की शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती. कंपनी डिलरच्या संपर्कात असून त्यांना आवश्यक ती सर्व मदत करत आहोत. सुरक्षितता ही ओकिनावाची प्राथमिकता आहे आणि आम्ही आमच्या स्कूटर बनवताना सुरक्षिततेच्या सर्व स्टँडर्ड्सचं पालन करतो असं स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आलं आहे.